वाघोलीत साडेचार लाखांचा गुटखा, विदेशी सिगारेट जप्त; दोघे अटकेत

कारवाईत पोलिसांनी ४ लाख ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे: वाघोली परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमधील बंद खोलीत साठा करून ठेवलेला मोठ्या प्रमाणावरील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि वैधानिक इशारा नसलेल्या विदेशी सिगारेटवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे.

जहीर नूरमोहम्मद शेख (वय ४०) आणि अकील नूरमोहम्मद शेख (वय ३८, दोघे रा. वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश आणि सलमान (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्किंगमधील खोलीत होता साठा
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) गुन्हे शाखा युनिट ७ चे पथक वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाघोली-केसनंद रोडवरील गायत्री पार्क इमारतीच्या पार्किंगमधील एका बंद खोलीत प्रतिबंधित गुटखा आणि विदेशी सिगारेटचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व ‘कोटपा’ कायद्यानुसार गुन्हा
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, तिथे विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि शासनाने बंदी घातलेल्या विदेशी सिगारेटचे साठे मिळून आले. हा माल आरोपींनी दिनेश आणि सलमान यांच्याकडून खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (COTPA) अधिनियम २००३ नुसार गुन्हा (गु.र.नं. २८६/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे आणि महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पानसरे यांच्या पथकाने केली आहे.
Gutkha worth Rs 4.5 lakh, foreign cigarettes seized in Wagholi; Two arrested


