पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : पिंपरीत कॉलेजच्या बाहेर दोन विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला

Pune News :पिंपरी: टी वाय बीकॉमचा पेपर देण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यावर जुन्या भांडणाचा राग मनात धरून रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास महात्मा फुले कॉलेज, पिंपरी येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणात गौरव उमेश गुप्ता (२०, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहील मनोहर, लकी जावळे, रुपेश मोघेड, सागर गायकवाड (रा. भोसरी) आणि निशांत अहिरे (रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रासोबत टी वाय बी कॉम चा पेपर देण्यासाठी गेले होते. कॉलेजच्या बाहेर गाडी लावत असताना आरोपींनी तिथे येऊन जुन्या भांडणाचा राग धरून फिर्यादीला बांबू, रॉड व हाताने पाठीवर, तोंडावर मारून जखमी केले. तसेच साहिल याने फिर्यादीच्या खिशात असलेला मोबाईल रॉड मारून फोडला आणि भांडण सोडवण्यास आलेला मित्रालाही रॉडने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


भोसरीत शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ३२ लाखांची फसवणूक

पिंपरी: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून प्रति महिना अडीच टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने एकाची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना २३ फेब्रुवारी २०२१ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत यश अॅव्हेन्यू, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात नितीन निवृत्ती आढळराव (४२, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित भालचंद्र ठाकरे (४५, रा. पाषाण) आणि अमित गिरीष नारखेडे (३५, रा. रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून प्रति महिना अडीच टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवले. त्यात फिर्यादीकडून ३५ लाख रुपये घेतले. सुरुवातीला आरोपींनी फिर्यादी यांना नफ्याची रक्कम दिली. फेब्रुवारी २०२४ नंतर नफा देण्याचे बंद केले. फिर्यादीने मूळ रक्कम परत मागितली असता केवळ दोन लाख ७० हजार रुपये परत करून उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि एकूण ३२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


पिंपरीत जीएसटीची रक्कम न भरता ३५ लाखांची फसवणूक

पिंपरी: दुकानदाराचे जीएसटी आणि वस्तूंचे बिल स्वतःच्या फर्मच्या खात्यात वळवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन २०२० ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आंबेडकर चौक, पिंपरी येथे घडली.

या प्रकरणात राजा ओमप्रकाश गोधवाणी (४६, रा. पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार जब्बार शयफुददिन पटेल (३२, रा. थेरगाव) आणि मकरंद अनिल घेवारी (४०, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जब्बार पटेल हा फिर्यादीच्या दुकानातील अकाउंट व जीएसटी भरण्याचे काम पाहत असे. त्याने दुकानातील साहित्याचे बिल स्वतःच्या आणि मकरंद घेवारीच्या फर्मच्या नावावर घेऊन, एकूण ३४ लाख ९६ हजार ९६३ रुपयांची जीएसटी रक्कम न भरता ती स्वतःकडे घेवून फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.


रोलरच्या धडकेने कामगाराचा मृत्यू

पिंपरी: चुकीच्या पद्धतीने आणि हलगर्जीपणे रोलर चालवून एका कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रोलरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (२० ऑक्टोबर) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास खराबवाडी गावच्या हद्दीत, नवीन मदरसन कंपनीचे कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी घडली.

कैलास रमेश कोकरे (३२) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल संतोष होजगे यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिमराव यशवंत वैद्य (३३, रा. आंबेगाव, जि. हिंगोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोलरचालकाने त्याच्या ताब्यातील रोलर हयगयीने व रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवला. त्याने अपघातात कैलास कोकरे या कामगाराला गंभीर दुखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


च-होली खुर्द येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी चालकाचा मृत्यू

पिंपरी: भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवून दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी करून पसार झाल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास मौजे च-होली खुर्द गावचे हद्दीत, प्लुमेरीया मंगल कार्यालयासमोर रोडवर घडली.

अंकुश जनार्दन पांढरे (४४) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणात किरण भागवत पांढरे (४०, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चुलत भाऊ अंकुश पांढरे हे दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनचालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने आणि नियमांचे उल्लंघन करून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अंकुश पांढरे खाली पडून उजव्या बाजूच्या हाताला, डोक्याला, कानाला व पोटाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर चालक न थांबता निघून गेला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button