भोसरीत भरधाव कार पलटी होऊन तरुणाचा मृत्यू

गाडीपुढे कुत्रा आल्याने नियंत्रण सुटले
पिंपरी: भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. १४) रात्री एक वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस स्टेशनजवळ घडली.

याप्रकरणी अभिषेक बाळासाहेब मुळीक (२५, रा. गंधर्वनगरी, वृंदावन कॉलनी, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष बनकर हा त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने चालवत होता. दरम्यान, अचानक समोर कुत्रा आल्याने कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली.
या अपघातात फिर्यादीचा लहान भाऊ आशिष बाळासाहेब मुळीक (वय २२) हा गंभीर जखमी झाला. तसेच, चालक आयुष बनकर यालाही गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान आयुष बनकर याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मांजरे करीत आहेत.


