Thane News : ‘गुन्हा कबूल नाही!’ – रेल्वे भरती बोर्ड मारहाण प्रकरणी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर, न्यायालयाने दिली ‘एक महिन्याची डेडलाईन’

2008 मधील प्रक्षोभक भाषणाच्या खटल्याची सुनावणी; न्यायमूर्तींनी थेट विचारणा करताच राज ठाकरेंनी दिले स्पष्ट उत्तर; “सहकार्य करा, तुम्हाला यायची गरज पडणार नाही.”
ठाण :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवार, 11 डिसेंबर) सकाळी ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर हजर झाले. 2008 मधील रेल्वे भरती बोर्ड परीक्षा संबंधित मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या जुन्या प्रकरणी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली.
कल्याण कोर्टात दाखल झालेला हा खटला आता ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात हस्तांतरित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेले त्यांचे सात सहआरोपी, ज्यात नितीन देसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि नितीन सरदेसाई यांचा समावेश होता, तेही यावेळी कोर्टात उपस्थित होते.
सुनावणी सुरू होताच, न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना थेट विचारणा केली की, “गुन्हा कबूल आहे का?” त्यावर राज ठाकरे यांनी कोणताही विलंब न लावता स्पष्ट उत्तर दिले, “मला गुन्हा कबूल नाही.” राज ठाकरे यांच्या बाजूने ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी युक्तिवाद केला.
राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर, या प्रकरणावर लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा न्यायाधीशांनी व्यक्त केली. न्यायालयाने यावेळी सूचक विधान केले. न्यायमूर्ती कुलकर्णी म्हणाले, “एक महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा. जर सहकार्य केले तर जून महिन्यापर्यंत प्रकरण संपेल आणि तुम्हाला यायची गरजही पडणार नाही,” असे म्हणत त्यांनी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी एक महिन्याची डेडलाईन दिली आहे.

