Devendra Fadnavis : पडळकरांचे विधान योग्य नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

•पडळकर तरुण नेते आहेत, बोलताना ‘ॲग्रेशन’ लक्षात घेत नाहीत; पवारांनीही फोन करून नाराजी व्यक्त केली होती
मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेले विधान योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले असून, या संदर्भात आपण पडळकर यांच्याशी तसेच शरद पवार यांच्याशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील ‘स्टील महाकुंभ’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले, ते योग्य आहे असे माझे अजिबातच मत नाही. वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल बोलणे योग्य नाहीये.”
या संदर्भात आपण स्वतः पडळकरांशी बोललो असून, त्यांना याबाबत सांगितले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “शरद पवारांचाही मला फोन आला होता. ते देखील या संदर्भात माझ्याशी बोलले आहेत, मी त्यांनाही सांगितले आहे की अशाप्रकारच्या विधानांना आम्ही कधीच समर्थन करणार नाही,” असे ते म्हणाले. पडळकर हे तरुण नेते असून, अनेकदा ते बोलताना आपल्या ‘ॲग्रेशन’चा काय अर्थ निघेल हे लक्षात घेत नाहीत, असे सांगत, “भविष्यात तुम्हाला चांगली संधी आहे, त्यामुळे बोलताना काय परिणाम होतील, याचा विचार करायला हवा,” असा सल्ला आपण दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
‘स्टील उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला येणार’
याचवेळी, फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासंदर्भातही महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, सध्या स्टील उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, पुढील आठ वर्षांत महाराष्ट्र या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. ‘ग्रीन स्टील’साठी 5 हजार कोटींचा निधी असून, यामुळे 1 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. तसेच, गडचिरोलीमध्ये नवीन स्टील हब तयार होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
