Mulund Crime News : मुलुंड हादरले! बोलणे बंद केल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी आशिष बनसोडला बेड्या

•बदलापूरचा सिरियल गुन्हेगार अटकेत; मुलीच्या मित्रावरही वार करून दिली जीवे मारण्याची धमकी
मुंबई :- मुंबईतील मुलुंड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ बोलणे बंद केले आणि टाळले, या रागातून बदलापूर येथील एका तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिच्या मित्रावरही आरोपीने वार केले आहेत. मुलुंड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आशिष बनसोड याला शस्त्रासह अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी हे दोघेही बदलापूरचे रहिवासी असून त्यांची जुनी ओळख होती. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने गेल्या काही दिवसांपासून आशिषशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. याचाच राग मनात धरून आशिषने तिचा पाठलाग केला. मुलगी मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ असताना, आशिषने तिला गाठले आणि सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने थेट तिच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
मित्रावरही हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी
यावेळी मुलीसोबत असलेल्या तिच्या एका मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या आशिषने त्याच्यावरही कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तेथेच सोडून “पुन्हा दिसलात तर जीवे मारीन,” अशी धमकी देत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी वेगाने हालचाली करून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
पोलिस तपासात समोर आले आहे की, अटक करण्यात आलेला आशिष बनसोड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. बदलापूरमधून मुलुंडमध्ये येऊन त्याने हा कट रचल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला असून, दोन्ही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कॉलेजबाहेर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलुंड पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, अशा विकृत मानसिकतेच्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
