
Malad Latest Crime News : शेअर रिक्षामधील किरकोळ वादाचे मोठ्या भांडणात रुपांतर; पठाणवाडीतील तरुणांकडून मारहाण, पोलिसांकडून 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल
मुंबई :- अहमदाबादहून मुंबईत पाहुण्यांकडे आलेल्या दोन हिंदू मुलींना मालाड (पूर्व) येथे रिक्षात बसण्याच्या किरकोळ वादातून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाबाद येथील एक कुटुंब आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. हे कुटुंब मालाड परिसरात शॉपिंगसाठी गेले असताना हा प्रकार घडला:
रिक्षासाठी रांग: मालाड रेल्वे स्टेशनजवळ हे कुटुंब शेअर रिक्षासाठी रांगेत उभे होते. पीडित मुली रांगेत पुढे उभ्या असताना तिथे उपस्थित असलेल्या एका बुरखाधारी महिलेसोबत त्यांचा रिक्षात बसण्यावरून शाब्दिक वाद झाला.
वादाचे रुपांतर मारहाणीत: हा वाद इतका विकोपाला गेला की, कुरारच्या पठाणवाडी परिसरातून काही तरुण तिथे आले आणि त्यांनी या मुलींना व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
संजय निरुपम यांचा इशारा
या घटनेची माहिती मिळताच दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाला आधार दिला होता. त्यांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचा इशारा पोलिसांना दिला होता. आज पुन्हा एकदा निरुपम यांनी कुरार पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. “बाहेरून आलेल्या पाहुण्यांना आणि विशेषतः महिलांना अशा प्रकारे मारहाण होणे सहन केले जाणार नाही. अटक केलेल्या आरोपींवर कठोर कलमान्वये कारवाई करून त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
