पर्वतीत जुन्या वादातून दोन तरुणांवर खुनी हल्ला
एकाला अटक, तीन अल्पवयीन ताब्यात
1 मिनिट वाचन

एकाला अटक, तीन अल्पवयीन ताब्यात
पुणे: पर्वती गावातील लक्ष्मीनगर भागात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १९ वर्षीय तरुणावर आणि त्याच्या मित्रावर लोखंडी हत्यारे व लाकडी बॅटने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रेमळ हनुमान मंदिराजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मोहित अरुण चक्रनारायण (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पर्वती गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय पोलिसांनी तीन विधीसंघर्षित बालकांना (अल्पवयीन मुले) ताब्यात घेतले असून दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. पर्वती गावातील एका १९ वर्षीय तरुणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
लोखंडी हत्यारे आणि बॅटने मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि त्याचा मित्र प्रेमळ हनुमान मंदिराजवळील रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. त्यांच्यात आधी झालेल्या वादाची कुरापत काढून आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी हत्यारांनी आणि लाकडी बॅटने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर जोराने वार केले. हा हल्ला फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आला होता. या हल्ल्यात फिर्यादी तरुण आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
शस्त्र कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १८९(२), १९०, १९१ (३) सह शस्त्र कायदा कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ११९/२०२६) दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.




