Pune News : कंत्राटदाराचा निष्काळजीपणा बेतला जिवावर ; ससून आवारातील टाकी दुर्घटनेतील जखमी कामगाराचा मृत्यू
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : बी.
2 मिनिट वाचन

Pune News : कंत्राटदारावर गुन्हा दाखल
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहाच्या आवारात १६ सप्टेंबर रोजी ५० फूट उंच पाण्याच्या टाकीचे पाडकाम सुरू असताना टाकीचा काही भाग अंगावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय कामगाराचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत बंडगार्डन पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता ठेकेदाराने हे काम हाती घेतल्याचा दावा काही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
सुरेश शंकर शिंदे (वय ४५, रा. पणिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ वसंत शिंदे (वय ३५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून भारतीय न्याय संहितेच्या ) कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे), २९० (इमारत पाडताना निष्काळजीपणाचे वर्तन) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रितपणे केलेले कृत्य) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुकेश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटदाराचे नाव असून तोदेखील या घटनेत जखमी झाला आहे. पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही.https://maharashtramirror.com/ Pune News
ही घटना १६ सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. पुण्यातील ससून रुग्णालयाजवळील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहाच्या आवारातील जुनी उंचावरील पाण्याची टाकी पाडण्याचे काम कामगार करत होते. फिर्यादीनुसार कंत्राटदाराने पाडकामासाठी कामगारांना कामावर ठेवले होते. मात्र त्यांना पुरेशी सुरक्षा साधने, सुरक्षेच्या पद्धती आणि आवश्यक संरक्षक उपकरणे पुरवण्यात अपयश आले.
तक्रारीनुसार, पाडकाम सुरू असतानाच टाकीचा काही भाग अचानक कोसळला आणि तो थेट शिंदे यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. ते ढिगाऱ्याखाली अडकले होते; पुणे अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु २१ सप्टेंबरच्या सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना घडण्यापूर्वी, म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी टाकीचा काही भाग कोसळल्यानंतर ती धोकादायक घोषित करण्यात आली होती. सुमारे ५० फूट उंच आणि जवळपास दोन लाख लिटर क्षमता असलेली ही टाकी गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झाली होती. १२ सप्टेंबर रोजी ही रचना धोकादायक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि बांधकाम विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बी. जे. मेडिकल कॉलेज प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली होती.
त्यानंतर 'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण' या शासकीय एजन्सीमार्फत हे पाडकाम हाती घेण्यात आले होते. १६ सप्टेंबरच्या पहाटे पाडकामाचे ऑपरेशन सुरू असतानाच या संरचनेचा मोठा भाग अचानक खाली कोसळला आणि शिंदे ढिगाऱ्याखाली दाबले गेले.
पाडकामादरम्यान ठरवून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन केले गेले होते की नाही, तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यास कंत्राटदार किंवा इतर जबाबदार व्यक्ती अयशस्वी ठरल्या का, याचा तपास सध्या बंडगार्डन पोलीस करत आहेत.
'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्याचे हात वर
कामगाराच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनेची तसेच त्यांच्यावर होणाऱ्या आरोपावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी 'बी. जे. मेडिकल' हा शब्द ऐकताच फोन कट केला. त्यांना घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास थेट टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर गेल्या दोन दिवसांपासून ठेकदारचा फोन 'स्विच ऑफ' येत आहे.




