Sanjay Raut : शरद पवारांच्या उमेदवारीसाठी 'विलीनीकरण' रोखण्याची अट? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; "दंतकथा संपली, आता संघर्षाची तयारी!"
Sanjay Raut On Sharad Pawar : मविआकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब | "विलीनीकरण ही आधीपासूनच दंतकथा होती" - राऊतांचा टोला | विरोधी पक्षातील नेत्यांना सत्तेच्या मागे न धावण्याचा सूचक इशारा
2 मिनिट वाचन

Sanjay Raut On Sharad Pawar : मविआकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब | "विलीनीकरण ही आधीपासूनच दंतकथा होती" - राऊतांचा टोला | विरोधी पक्षातील नेत्यांना सत्तेच्या मागे न धावण्याचा सूचक इशारा
मुंबई :- येत्या 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर, आता महाविकास आघाडीनेही (MVA) शरद पवार Sharad Pawar यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, या पाठिंब्यापूर्वी मविआमध्ये मोठी खलबतं झाली असून, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अधिकृतपणे थांबवल्यानंतरच पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
विलीनीकरणाची अट आणि उमेदवारीचा मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसने एक महत्त्वाची अट ठेवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. जोपर्यंत विलीनीकरणाचा प्रश्न कायमस्वरूपी थांबवला जात नाही, तोपर्यंत पाठिंबा मिळणार नाही, अशी भूमिका मित्रपक्षांनी घेतली होती. काल जयंत पाटील यांनी "आता विलीनीकरण होणार नाही" असे स्पष्ट केल्यानंतरच, मविआने शरद पवारांच्या उमेदवारीची घोषणा केली.
"विलीनीकरण म्हणजे केवळ दंतकथा!"
या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार, या केवळ दंतकथा होत्या. अजित पवार असतानाही माझं हेच मत होतं की यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आता ती दंतकथा अधिकृतपणे संपली आहे, हे चांगलंच झालं. आम्हाला सर्वांना आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे काम करायचे असून, त्यासाठी आमची मानसिक तयारी पूर्ण झाली आहे."
विरोधी पक्षाला दिला सूचक इशारा
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना राऊतांनी स्वपक्षीय आणि मित्रपक्षांतील नेत्यांना एक इशाराही दिला. ते म्हणाले,"सत्ता येते आणि जाते, पण जनतेने
आम्हाला विरोधी पक्षाची जबाबदारी दिली आहे. भाजपची सरकारे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली असून जनतेसमोर प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळी विरोधी पक्षाने जनतेचा आवाज बनायला हवे. जे सध्या विरोधी पक्षात आहेत, त्यांनी आता सत्तेच्या मागे धावू नये, तर आगामी निवडणुकांच्या तयारीला लागावे."
16 मार्चला फैसला
महाराष्ट्रातील 7 जागांपैकी भाजपचे 4 उमेदवार निवडून येण्याची शक्यता असताना, शरद पवारांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीची एक जागा आता निश्चित मानली जात आहे. पवारांना संसदेत पाठवून 'इंडिया' आघाडीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.




