कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा CRPF जवानांवर हल्ला; तीन जवान जखमी, एकाची प्रकृती गंभीर
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी दुपारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) गस्ती पथकावर गोळीबार केला.
2 मिनिट वाचन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी दुपारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) गस्ती पथकावर गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी नाक्यावर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यात CRPFचे तीन जवान जखमी झाले असून, त्यापैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
CRPFने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक जवानांवर गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबारात जखमी झालेल्या जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच शीघ्र कृती दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
या हल्ल्यात राकेश दास, संतोष चंद्रू आणि सोमवीर सिंह हे तीन जवान जखमी झाले आहेत. राकेश दास यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. संतोष चंद्रू यांच्या पोटात आणि पाठीच्या कण्याजवळ गोळी लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. तर सोमवीर सिंह यांच्या डाव्या हाताला गोळी लागली असून, त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
परिसरात नाकाबंदी, हल्लेखोरांचा शोध सुरू
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात असून, परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वीही दहशतवादविरोधी कारवाया
दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला बांदिपोरा येथे बंदी घालण्यात आलेल्या इत्तेहाद-उल-मुस्लिमीन संघटनेशी संबंधित फुटिरतावादी आणि दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
याआधी सप्टेंबरमध्ये उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सद्दाम आणि मुस्तफा अशी त्यांची नावे होती. त्यांच्याकडून एके असॉल्ट रायफल, चार मॅगझिन, एम-४ कार्बाइन, ग्लॉक पिस्तूल आणि चार ग्रेनेड जप्त करण्यात आले होते.
कुलगाममधील ताज्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे.




