मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबईत दिवाळीत फटाक्यांमुळे ३३३ ठिकाणी आग

यंदा दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबई शहरात आगीच्या तब्बल ४९९ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी ३३३ घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

मुंबईत दिवाळीत फटाक्यांमुळे ३३३ ठिकाणी आग
यंदा दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबई शहरात आगीच्या तब्बल ४९९ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी ३३३ घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत.

मुंबई, महाराष्ट्र मिरर : यंदा दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबई शहरात आगीच्या तब्बल ४९९ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी ३३३ घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. या दुर्घटनांमध्ये १० जण जखमी झाले, तर मालाड-मालवणी येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १६ वर्षांच्याS मुलाचा मृत्यू झाला.

गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी पाहता यंदा फटाक्यांमुळे लागलेल्या आगींच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. २०२४ मध्ये दिवाळीदरम्यान मुंबईत आगीच्या २६२ घटना घडल्या होत्या. त्यापैकी ८० घटना फटाक्यांमुळे झाल्या होत्या. २०२५ मध्ये आगीच्या घटनांची संख्या २८९ होती, तर त्यातील ११३ घटना फटाक्यांशी संबंधित होत्या. यंदा मात्र फटाक्यांमुळे लागलेल्या आगींची संख्या थेट ३३३ वर पोहोचली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक घटना

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, म्हणजेच ८ नोव्हेंबरला मुंबईत आगीच्या सर्वाधिक १४२ घटनांची नोंद झाली. त्यापैकी १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्या. ९ नोव्हेंबरला आगीच्या १६६ घटना नोंदवण्यात आल्या. त्यातील १४४ घटना फटाक्यांशी संबंधित होत्या. दिवाळी पाडव्याच्या दिवशी, १० नोव्हेंबरला आगीच्या १०२ घटना घडल्या असून, त्यापैकी २४ घटना फटाक्यांमुळे झाल्या.

बंदी असूनही रॉकेटचा वापर

मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. उंच इमारतींची छते, बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये रॉकेट पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याचा धोका असतो. या बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, कारवाई नेमकी कोणी आणि कशी करायची, याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने अंमलबजावणीत अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. बंदीनंतर किती ठिकाणी कारवाई झाली, याची आकडेवारीही महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

जनजागृतीनंतरही फटाक्यांचा वापर कायम

न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बॉलिवूड कलाकारांच्या माध्यमातून नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, जनजागृती आणि बंदी असूनही फटाक्यांचा वापर कमी झालेला दिसत नाही. परिणामी, दिवाळीदरम्यान आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेअर करा