मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा

Sanjay Raut : ‘महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

MP Sanjay Raut
MP Sanjay Raut

Sanjay Raut : मुंबई : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डिलिमिटेशनच्या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी देशातील जनतेशी विश्वासघात केल्यासारखे होईल, असा इशारा देत राऊत यांनी भाजपसह या प्रक्रियेला पाठिंबा देणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी २७ नोव्हेंबर रोजी डिलिमिटेशन प्रक्रियेला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली. या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत आणि शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघर्षाच्या भूमिकेत सक्रिय राहू शकत नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली. अन्यथा अशा पद्धतीने डिलिमिटेशन विधेयक संसदेत आणण्याचे धाडस भाजपने केले नसते, असेही राऊत यांनी म्हटले.

‘डिलिमिटेशन हा देशातील जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी भाजपने रचलेला कट आहे. या प्रक्रियेला जो कोणी पाठिंबा देईल, तो देशातील जनतेशी विश्वासघात करणारा ठरेल. इतिहास गद्दारांची नावे कायम लक्षात ठेवतो,’ अशा कठोर शब्दांत राऊत यांनी आपला विरोध व्यक्त केला. तसेच सर्व लोकशाहीवादी पक्षांनी संसदेत या प्रस्तावाला विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत पक्षांतर्गत आणि विरोधी आघाडीतही वेगवेगळे सूर उमटत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंब्याची भूमिका मांडली असली, तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतरच पक्षाची अंतिम भूमिका स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय राहणार आणि त्याचा महाविकास आघाडीच्या एकजुटीवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर