Pune News : पुणेकरांवर दोन दिवस पाणीकपातीची टांगती तलवार
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणेकरांना आता पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
2 मिनिट वाचन

Pune News : मनपा घेणार आठ दिवसांत अंतिम निर्णय
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणेकरांना आता पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. दुष्काळाची संभाव्य शक्यता आणि 'अल निनो' प्रभावामुळे या वर्षी पावसाळ्यात झालेली कमी वृष्टी लक्षात घेता, पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सध्या लागू असलेल्या १० टक्के पाणीकपातीत वाढ करून ती २० टक्के करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर २० टक्के कपातीचा निर्णय झाल्यास पुणेकरांना आठवड्यातून तब्बल दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता असून, याबाबतचे सूक्ष्म नियोजन आगामी आठ दिवसांत केले जाईल, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाणीकपातीची शिफारस
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहरात २० टक्के पाणीकपात लागू करण्याची शिफारस केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा जपून ठेवण्यासाठी आणि तो पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना १६ ऑक्टोबरपासून जलसंवर्धनाचे कठोर उपाय राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने पावले उचलत सद्यस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
आता दर गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेने याआधीच पुण्यात दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा म्हणजेच १० टक्के कपातीचा निर्णय घेतला असून, या नवीन नियमाची अंमलबजावणी या आठवड्यापासून सुरू झाली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या शिफारशीनंतर पाणीकपात १० टक्क्यांवरून थेट २० टक्क्यांवर नेण्याबाबत महापालिका प्रशासन गंभीर विचार करत आहे. असे झाल्यास सध्याच्या एका दिवसाच्या ऐवजी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करावा लागू शकतो.
"शहरातील विविध भागांची पाण्याची गरज, तेथील पाणीपुरवठ्याचे प्रमाण आणि उपलब्ध जलसाठा याचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. ज्या भागात पाणी पुरवठा जास्त आहे आणि जिथे कमी आहे, तिथे वेगवेगळ्या स्वरूपाचे नियम लागू केले जाऊ शकतात."
- नवलकिशोर राम, मनपा आयुक्त
धरणांमधील पाणीसाठ्यात घट
पाण्याच्या उपलब्धतेबाबत बोलताना आयुक्त नवलकिशोर राम यांनी चिंतेची बाब स्पष्ट केली. गेल्या वर्षी याच कालावधीत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर यंदा हा साठा केवळ ८० टक्क्यांच्या आसपासच आहे. पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेली ही तफावत भरून काढण्यासाठी पिण्याच्या पाशाला प्राधान्य देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गळती आणि विनावापर पाण्यावर अंकुश
अतिरिक्त पाणीकपातीचा ताण थेट नागरिकांवर येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचा अपव्यय रोखण्यावर भर दिला आहे. शहरात पाइपलाइनमधील गळतीमुळे सुमारे ३० ते ४० टक्के पाणी वाया जात असून, ही गळती थांबवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच विनापरवाना व बेकायदेशीर नळ कनेक्शनवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, समान पाणीपुरवठा योजनेची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुढील आठ दिवसांत महापालिका सर्वंकष नियोजनाचा आढावा घेऊन पाणीकपात वाढवण्याबाबत किंवा सध्याची १० टक्के कपात कायम ठेवण्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करेल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत मितव्ययाने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




