Pune News : आचारसंहितेच्या फेऱ्यात महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला
Pune News पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना घरोघरी फराळाची तयारी, मुलांच्या कपड्यांची खरेदी, घरखर्चाचे नियोजन आणि सणासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
2 मिनिट वाचन

Pune News : दिवाळीपूर्वी '५० हजारांची उचल' देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
Pune News पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना घरोघरी फराळाची तयारी, मुलांच्या कपड्यांची खरेदी, घरखर्चाचे नियोजन आणि सणासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अशा उत्साहाच्या वातावरणात पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाची (दिवाळी बोनस) प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा बोनसची प्रक्रिया प्रशासकीय फेऱ्यात अडकली असून, दिवाळीपूर्वी ही रक्कम हातात पडण्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बोनस वेळेत मिळाला नाही तर किमान दिवाळी साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांची उचल द्यावी, असा प्रस्ताव महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रशासनासमोर ठेवला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे महापालिकेतील हजारो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. वर्षातील या सर्वात मोठ्या सणाची खरेदी करण्यासाठी आणि कुटुंबाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेचा कर्मचाऱ्यांना मोठा आधार असतो. त्यामुळे दिवाळी सुरू होण्याच्या किमान दहा दिवस आधी बोनसची रक्कम थेट खात्यात जमा व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. दरवर्षी त्यानुसार प्रशासनाकडून ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच परिपत्रक जारी करून वितरणाचे वेळेत नियोजन केले जाते.
मात्र, यंदा विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू आहे, तर दुसरीकडे ५ नोव्हेंबरपासून दिवाळीचा मुख्य सण सुरू होत आहे. त्यासोबतच सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी देण्यासंदर्भातील जुन्या कराराची मुदतही संपुष्टात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला नव्याने करार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. या करारासाठी स्थायी समिती आणि महापालिकेच्या मुख्य सभेची औपचारिक मंजुरी मिळवणे आवश्यक मानले जाते. आचारसंहिता संपल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांच्या कालावधीत ही संपूर्ण मंजुरीची आणि तांत्रिक वितरणाची प्रक्रिया पूर्ण करणे महापालिका प्रशासनासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाल्याने, कर्मचाऱ्यांनी प्रशासनासमोर एक पर्याय सुचवला आहे. सध्या महापालिकेकडून विविध सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांची उचल दिली जाते, जी नंतर हप्त्यांमध्ये पगारातून वसूल केली जाते. मात्र, सद्यस्थितीत महागाई आणि दिवाळीचा वाढता खर्च पाहता ही २० हजारांची मर्यादा अपुरी पडत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कर्मचाऱ्यांनी प्रशासनासमोर ठेवला पर्याय
त्यामुळे यंदाच्या दिवाळीसाठी ही उचल रक्कम २० हजारांवरून थेट ५० हजार रुपये करण्यात यावी. यामुळे बोनसची अधिकृत प्रक्रिया लांबणीवर पडली तरी कर्मचाऱ्यांच्या हातात सणासाठी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध होईल. पुढे सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर होऊन जेव्हा रक्कम वितरित होईल, तेव्हा त्या बोनसच्या रकमेतून थेट ३० हजार रुपये कपात करून घ्यावेत.
उर्वरित २० हजार रुपयांची रक्कम नियमानुसार सोयीस्कर हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी. असा पर्याय कर्मचार्यांनी प्रशासनासमोर ठेवाल आहे.
या निर्माण झालेल्या तांत्रिक पेचावर मार्ग काढण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सानुग्रह अनुदान, बक्षिसीचा करार आणि कर्मचाऱ्यांनी सुचवलेला ५० हजार रुपयांच्या उचलीचा पर्याय यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
महापालिका आयुक्त, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे नेते यावर काय सुवर्णमध्य काढतात, याकडे आता पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.




