मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव: प्रशासकीय तयारी पूर्ण, पण ‘डीजे’ आणि ‘ढोल-ताशा’च्या मुद्यावर रंगला वाद

पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव: प्रशासकीय तयारी पूर्ण

VK
Vikrant Kulkarni

4 मिनिट वाचन

पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव: प्रशासकीय तयारी पूर्ण, पण ‘डीजे’ आणि ‘ढोल-ताशा’च्या मुद्यावर रंगला वाद!
पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव: प्रशासकीय तयारी पूर्ण, पण ‘डीजे’ आणि ‘ढोल-ताशा’च्या मुद्यावर रंगला वाद!

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आशिया खंडात आणि जगभरात आपल्या सांस्कृतिक वैभवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहराच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशोत्सव अधिक शांततामय, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे महानगरपालिकेत सोमवारी रात्री उशिरा विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाबाबत अनेक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आले असले, तरी ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ आणि ‘नदीपात्रातील ढोल-ताशा सराव’ या दोन मुद्द्यांवर झालेला वाद आणि गदारोळ संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

यंदाचा गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, बैठकीत महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाचा जागतिक पातळीवर प्रसार करण्यासाठी आणि समृद्ध इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष डॉक्युमेंट्री तयार केली जाणार आहे. गणेश मंडळांना सर्व परवानग्या अत्यंत सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने एकाच ठिकाणी मिळण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा असलेली एक खिडकी योजना सुरू केली जाईल. शहरातील प्रत्येक अधिकृत गणेश मंडळाची सविस्तर माहिती आणि स्थान एका विशेष वेबसाइटवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल. https://maharashtramirror.com/ Pune News

उत्सवाच्या काळात समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महापालिका प्रभागासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उत्सवापूर्वी शहरातील सर्व प्रमुख रस्ते, खड्डे आणि प्रामुख्याने विसर्जन मार्गांची तातडीने दुरुस्ती केली जाईल. भाविकांसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवली जाईल, तसेच महिला वर्गाच्या सोयीसाठी विशेष ‘हिरकणी कक्ष’ उभारले जातील.

तसेच, मंडळांच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या शुल्कात सवलत दिली जाईल आणि खाद्यपदार्थांच्या अधिकृत स्टॉलधारकांना सकारात्मक सहकार्य केले जाईल. युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी गणेशोत्सव काळात विशेष जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहिन राबवली जाईल. विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, भाविकांच्या प्रवासासाठी मेट्रोचे तिकीट नेटवर्क आणि फेऱ्या सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

…तर त्यांनी पुण्याबाहेर जाऊन रहावे

एकीकडे प्रशासकीय तयारीची ही सकारात्मक बाजू असतानाच, बैठकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाचा विषय निघताच वातावरण चांगलेच तापले. बैठकीच्या सुरुवातीलाच एका पर्यावरणप्रेमी नागरिकाने गणेशोत्सवात मोठ्या आवाजातील डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांचा वापर पूर्णपणे बंद करून ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच, स्पीकर, डीजे आणि मोठ्या आवाजाचा त्रास होत असल्यामुळे या गोष्टींना फाटा द्यावा, अशी ठाम भूमिका मांडली.

या भूमिकेला उपस्थित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत विरोध केला. ‘ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे, पर्यावरणप्रेमींची बाजू ऐकण्यासाठी वेगळी बैठक घ्यावी’ असा पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी आक्रमक शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावर काही कार्यकर्त्यांनी संबंधित नागरिकाला सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी केली. एका उपरोधिक डीजे समर्थक प्रतिनिधीने तर, “जर तुम्हाला या आवाजाचा त्रास होतो, तर आपण या उत्सवाच्या कालावधीत पुण्याबाहेर जाऊन राहावे, आपल्या जेवणाची व्यवस्था केली जाईल,” असे उपरोधिक वक्तव्य केले. अखेर वाढत्या गदारोळामुळे महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी संबंधित पर्यावरणप्रेमी नागरिकाला सभागृहाबाहेर नेले, ज्यामुळे हा सर्व प्रकार मोठा चर्चेचा विषय ठरला.

ढोल-ताशा संस्कृतीवर निर्बंधांना मंडळांचा कडाडून विरोध

बैठकीत केवळ डीजेचाच नव्हे, तर नदीपात्रात होणाऱ्या पारंपरिक ढोल-ताशा पथकांच्या सरावाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पर्यावरणाच्या दृष्टीने नदीपात्रातील अशा उपक्रमांवर काहींनी आक्षेप नोंदवले. मात्र, या मुद्द्यावरही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असून ढोल-ताशा हा या उत्सवाचा अत्यंत कणा व महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, याबाबत दुमत नाही; परंतु पुण्याच्या अस्मितेचा भाग असलेल्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीवर कोणतेही जाचक निर्बंध आणले जाऊ नयेत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. "गणेशोत्सव पूर्णपणे निर्बंधमुक्त असावा. जर यावर कोणतीही एसओपी (SOP) बनवायचीच असेल, तर ती एक जानेवारी २०२७ पासून बनवावी आणि ती केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर शहरातील सर्व धर्मीयांच्या सणांना लागू करावी, अशी आक्रमक मागणी कार्यकर्त्यांनी केली.

तसेच, साउंडवर अनावश्यक निर्बंध आणू नका. परंतु गाणी कोणती लावावीत, गाण्यांची निवड कशी असावी आणि वेडेवाकडे नाचण्याबाबत कार्यकर्त्यांनी स्वतःच नैतिक भान बाळगले पाहिजे, असा सुसंस्कृत सूरही काही जाणकार कार्यकर्त्यांनी लावला.

महापौरांचे घूमजाव

काही दिवसांपूर्वी आपली ‘डीजे विरोधी भूमिका’ पूर्णपणे ठाम असल्याचे सांगत महापौर मंजुषा नागपुरे यांनी तशी घोषणाही केली होती. वारीच्या काळातही त्यांनी असेच जाहीर आवाहन केले होते. मात्र, या बैठकीत झालेल्या तीव्र विरोधानंतर महापौरांनी आपली भूमिका मवाळ करत घूमजाव केले. आता महापालिका आणि पोलीस प्रशासन मिळून संयुक्तपणे एक सर्वसमावेशक एसओपी (SOP) तयार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर डॉल्बीच्या किती भिंती असाव्यात, आवाजाची मर्यादा किती डेसिबल असावी, याविषयी सर्वसमावेशक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पुढच्या वर्षापासून केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनीही कायदा व सुव्यवस्था राखत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले.

मुंबईमध्ये घडलेली दुर्घटनेचा पालिकेने धडा घ्यावा

विसर्जन मिरवणुकीचे परवाने केवळ एका दिवसाऐवजी किमान दोन दिवसांसाठी देण्यात यावेत. मुंबईतील भुलेश्वर येथे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावरील रस्त्यांमधील खड्डे तातडीने बुजवले जावेत आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जावी. पुण्यात बाहेरून येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर आकर्षक स्वागत कमानी बसवण्यात याव्यात. पूर्वभागात प्रवेश करताना भाविकांना अनावश्यक बॅरिकेटिंग करून मज्जाव केला जातो, त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीचे आणि गर्दीचे सुयोग्य नियोजन करावे. दहिहंडी उत्सवाच्या परवानगीची वेळ रात्री १० ऐवजी वाढवून १२ वाजेपर्यंत करावी (यावर जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले). अशा मागण्या यावेळी मंडळातर्फे करण्यात आल्या.

पुण्याचा हा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून तो महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख आहे. प्रशासनाचा वचक, नागरिकांचे शांततेचे अधिकार, डीजे-ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न आणि पुण्याची पारंपरिक ढोल-ताशा संस्कृती यामध्ये योग्य तो सुवर्णमध्य व समतोल कसा साधला जातो, याकडे आता संपूर्ण पुणेकरांचे आणि राज्यभरातील रसिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा