फटाका विक्रेत्याला टोळक्याकडून मारहाण, सहा जणांना अटक
भोसरी एमआयडीसी येथील होलसेल फटाका स्टॉलवर जुन्या वादाचा राग धरून एका टोळक्याने फटका विक्रेत्याला व त्यांच्या भावाला मारहाण करत दुकानात तोडफोड केली
1 मिनिट वाचन

पिंपरी: भोसरी एमआयडीसी येथील होलसेल फटाका स्टॉलवर जुन्या वादाचा राग धरून एका टोळक्याने फटका विक्रेत्याला व त्यांच्या भावाला मारहाण करत दुकानात तोडफोड केली आणि परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सेक्टर क्र. १२ भोसरी एमआयडीसी येथे घडली.
या प्रकरणात अमर अधिक साळुंखे (२५, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक बसवराज हळकवडे (१८, भोसरी), ओम बाबू जगताप (१९, रा. चिंचवड), समीर उत्तम गवळी (२०, चिंचवड), सुमित कमलाकर दाभाडे (२४, रा. पिंपरी), प्रदिप विठ्ठल कळसे (२०, रा. चिंचवड), सुरज कमलाकर दाभाडे (२०, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर यांनी सेक्टर १२ येथे फटाका स्टॉल सुरू केला होता. ते आणि त्यांचा भाऊ फटाका स्टॉलच्या समोर बसले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून अमर यांच्या भावाच्या छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी प्रतिकने अमर यांच्या तोंडावर हाताच्या कड्याने जोरात मारून दात पाडले. तर आरोपी प्रदिपने अमर यांचा ऍपलचा फोन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.




