Pune Crime News : वारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापा; अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका, महिला दलाल अटकेत
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : वारजे परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून एका अल्पवयीन मुलीसह एका महिलेची सुटका केली आहे.
1 मिनिट वाचन

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई; पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : वारजे परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून एका अल्पवयीन मुलीसह एका महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध पोक्सोसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला वारजे येथील मुंबई-बंगळुरू महामार्गावरील ‘साई एक्झिक्युटिव्ह लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग’ येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर संबंधित लॉजवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन पीडित मुलीसह एका महिलेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आश्लेषा सचिन सोमनकर (वय ३४) हिला ताब्यात घेतले. आरोपी महिला पीडितांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ४ व ५ तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक छगन कापसे आणि त्यांच्या पथकाने छापेमारीची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.




