सहकारनगरमध्ये घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला
कपाटातील १ लाख १६ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल लंपास
1 मिनिट वाचन

कपाटातील १ लाख १६ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल लंपास
पुणे: धनकवडी परिसरातील वनराई कॉलनी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्याने घराचे कुलूप उचकटून कपाटातील १ लाख १६ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील प्रियदर्शनी शाळेसमोर असलेल्या वनराई कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. २१) दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी आपले घर कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटले आणि आत प्रवेश केला.
चोरट्याने बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाख १६ हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादी सायंकाळी घरी परतल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि रोकडसह दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) आणि ३३१ (१)(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरवस्तीत आणि दिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
Property worth Rs 3.5 lakh stolen in house burglary in Sahakarnagar




