सिंहगड रोड पोलिसांनी ७० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ‘इनोव्हा’ चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
चोरलेली कार आणि मोपेड सहित एकूण १२ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 मिनिट वाचन

चोरलेली कार आणि मोपेड सहित एकूण १२ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: सिंहगड रोड परिसरातून महागडी ‘इनोव्हा क्रिस्टा’ कार चोरणाऱ्या सराईत चोरट्याचा पोलिसांनी ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्याला जेरबंद करून त्याच्याकडून चोरीची कार आणि एक वर्षापूर्वी चोरलेली मोपेड, असा एकूण १२ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गौरव जनार्दन कडू (वय ३२, रा. सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात १५ एप्रिल २०२६ रोजी गाडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड हद्दीतून एक पांढऱ्या रंगाची इन्होव्हा क्रिस्टा कार चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळापासून ते नऱ्हे-नांदेड सिटी भागातील तब्बल ७० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू असताना पोलीस अंमलदार उत्तम तारू, राहुल ओलेकर आणि सागर शेडगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कार चोरी करणारा इसम मोपेड घेऊन शरद हॉस्पिटल ते प्रयेजा सिटी रोडवर थांबला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून गौरव कडू याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेडबाबत संशय आल्याने अधिक चौकशी केली असता, त्याने ही गाडी एक वर्षापूर्वी नांदेड सिटी येथील पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली. या मोपेडबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात मे २०२५ मध्ये गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीची इन्होव्हा कार आणि मोपेड जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
Sinhagad Road Police nabs Innova thief with the help of 70 CCTV footage




