अनैतिक संबंधांतून आईच्या प्रियकराचा खून
हडपसर पोलिसांनी ६ संशयितांना ठोकल्या बेड्या
2 मिनिट वाचन

हडपसर पोलिसांनी ६ संशयितांना ठोकल्या बेड्या
पुणे: पुण्यातील ससाणेनगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आईच्या प्रियकराने केलेल्या त्रासाचा सूड घेण्यासाठी मुलीच्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

काळेपडळ पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या ४८ तासांत ६ संशयितांना अटक करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
घटनेचा तपशील
दिनांक ३ मे २०२६ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ससाणेनगर येथील हिंगणे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. गणेश संजु बिरादार (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपींनी गणेशला गाठून सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात प्रहार केला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याला जागीच ठार केले.
खून करण्याचे कारण
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत गणेश बिरादार याचे मुख्य आरोपी दुर्वांग (पारस) मानकर याच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून त्यांच्यात आधीपासून वाद होता. साधारण तीन महिन्यांपूर्वी गणेशचे दुर्वांगशी भांडण झाल्याने आणि दूर्वांगच्या प्रेयसीला गणेशने मारहाण देखील केली होती. या अपमानाचा आणि रागाचा बदला घेण्यासाठी दुर्वांगने आपल्या साथीदारांसह गणेशचा काटा काढण्याचे ठरवले.
पोलिसांची तत्पर कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३ तपास पथके तयार करण्यात आली होती. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या (सीसीटीव्ही व मोबाईल लोकेशन) आधारे पोलिसांनी साहील शेलार, चंद्रशेखर जावीर आणि सुरज दोरकर यांना ७ मे रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य सूत्रधार दुर्वांग मानकर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना खेड शिवापूर परिसरातून शिताफीने अटक करण्यात आली.
अटक केलेले संशयित
मुख्य आरोपी दुर्वांग ऊर्फ पारस सुनिल मानकर (वय २१, रा. शुक्रवार पेठ), साहील सागर शेलार (वय २४, रा. ससाणेनगर), चंद्रशेखर सोमिनाथ जावीर (वय २०, रा. सुखासागर नगर), सुरज रमेश दोरकर (वय २१, रा. हडपसर), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी), अभि ऊर्फ अभिजीत संजय इंगळे (वय २२, रा. दत्तवाडी).
सध्या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहा. पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वपोनि मानसिंग पाटील, पोनि अण्णासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित शेटे, सपोनि अजय हंचाटे, अंमलदार प्रवीण काळभोर, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, अमोल फडतरे, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदीप बेडिस्कर, गिरीराज जगदाळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, राकेश साळुंके, नितीन ढोले, यांच्या पथकाने पूर्ण केली.




