दौंड तालुक्यात जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न
विनयभंग करून पतीवर कोयत्याने हल्ला, पाच जणांवर गुन्हा
2 मिनिट वाचन

विनयभंग करून पतीवर कोयत्याने हल्ला, पाच जणांवर गुन्हा
पुणे: दौंड तालुक्यातील दापोडी येथे शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग करून त्यांना काठीने बेदम मारहाण केली, तसेच कोयत्याने डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, वार हुकल्याने आणि पाठलाग करताना आरोपी जमिनीवर पडल्याने फिर्यादीचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अमोल बापूराव रूपनवर (वय ४०, रा. दापोडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत अंकुश रूपनवर, राहुल तुकाराम रूपनवर, अंकुश बबन रूपनवर, तुकाराम बबन रूपनवर आणि चतुराबाई तुकाराम रूपनवर (सर्व रा. दापोडी, ता. दौंड) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८(१), ७४ (विनयभंग), ११५(२), ३५२, ३५१(२), १९० आणि १९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल रूपनवर हे त्यांची आई सुनंदाबाई आणि पत्नी मेधा यांच्यासह स्वतःच्या शेतात (गट नं. ६) काम करत होते. यावेळी आरोपी प्रशांत हा हातात कोयता घेऊन आणि राहुल हातात काठी घेऊन इतर तीन साथीदारांसह तेथे आले. “हे क्षेत्र आमचे असून आम्ही याचा ताबा घेणार आहोत,” असे म्हणत त्यांनी फिर्यादीला धमकावले. अमोल यांनी “न्यायालयाचा आदेश घेऊन या आणि मग ताबा घ्या,” असे म्हटल्याचा राग आरोपींना आला.
यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीचा हात धरून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पत्नीला वाचवण्यासाठी फिर्यादी गेले असता, आरोपी राहुलने त्यांना काठीने हात, पाय, पाठ आणि डोक्यावर बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी प्रशांतने अमोल यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. अमोल यांनी प्रसंगावधान राखून वार हुकवला आणि ते जिवाच्या आकांताने पळू लागले. प्रशांत कोयता घेऊन त्यांच्या मागे धावला, मात्र शेतातील मातीत पाय अडखळून तो खाली पडला. या संधीचा फायदा घेऊन फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय तेथून सुखरूप घरी पळून आले.
यवत पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जमिनीच्या वादातून भरदिवसा झालेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे दापोडी परिसरात खळबळ उडाली आहे.
Murder attempt over land dispute in Daund taluka




