Lonavla Crime : लोणावळ्यात ७४ लाखांचे कोकेन जप्त; एक ताब्यात
Lonavla Crime :लोणावळा : अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाने लोणावळ्यात कारवाई करत १४८ ग्रॅम कोकेन जप्त केले.
1 मिनिट वाचन

Lonavla Crime :अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची कारवाई; १४८ ग्रॅम कोकेन हस्तगत, आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता
Lonavla Crime :लोणावळा : अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाने लोणावळ्यात कारवाई करत १४८ ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त कोकेनची किंमत सुमारे ७४ लाख रुपये असून, या प्रकरणात सोनू सिताराम उपाध्याय (वय २८) याला ताब्यात घेण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Lonavla crime
टास्क फोर्सला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ७ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत लोणावळा परिसरात ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान उपाध्याय याच्याकडून १४८ ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ७४ लाख रुपये असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. याशिवाय १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल फोनही जप्त करण्यात आला. कारवाईत एकूण ७४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ नुसार अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८ (क) आणि २१ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर कोकेनचा पुरवठा नेमका कोठून झाला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पुढील तपास सुरू आहे. या तपासातून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली आहे.
विशेष पथकाची कारवाई
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नितीन बोधे, सचिन काळे, सहायक पोलीस निरीक्षक उदय काळे, पोलीस उपनिरीक्षक संजय अदलिंग, अमित तळोले तसेच पोलीस हवालदार प्रशांत बोमादती, अतिश कदम, शिवाजी रावते, योगीराज इगुलकर, संतोष राठोड, संतोष सोनवणे, वैभव मांडवे आणि मनीष भोईर यांच्या पथकाने केली.
अंमली पदार्थांची लागवड, जोपासना, विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन हा गंभीर अपराध असून, अशा प्रकारच्या व्यवहारांबाबत माहिती असल्यास अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे.




