वाघोलीत ४ लाख २७ हजारांचा गुटखा जप्त
कारमधून गुटख्याची वाहतूक करणारा तरुण जेरबंद
2 मिनिट वाचन

कारमधून गुटख्याची वाहतूक करणारा तरुण जेरबंद
पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ ने वाघोली परिसरात एक मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून कार आणि प्रतिबंधित गुटख्यासह एकूण ४,२७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १८ मे २०२६ रोजी करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट ७ चे पोलीस अंमलदार किरण पलांडे व विनायक साळवे हे वाघोली परिसरात गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना, त्यांना एका कारमधून प्रतिबंधित गुटख्याची विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने वाघोली ते केसनंद रोडवरील 'रॉयल गादी कारखान्या'समोर, काळेचा ओढा येथे सापळा रचला.
आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात
सापळा रचून पोलिसांनी एका संशयित शेवर्ले एन्जॉय कारला (क्र. एमएच ०५सीएच ०५३४) ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यात विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको आणि प्रीमियम आर.एम.डी. पान मसाला असा एकूण १,२२,००० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अरुणकुमार भलाराम खत्री (वय २० वर्षे, रा. कोरेगाव भिमा, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १ लाख २२ हजारांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपीविरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e) सह ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, किरण पलांडे, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, समाधान पाटील आणि प्रतिक्षा पानसरे यांच्या पथकाने केली.
पुणे क्राईम न्यूज




