Pune news : बिबवेवाडी कोंढवा रोडवरील पीएमटी कॉलनीतील भिंत हटविण्याचा मार्ग मोकळा ; येत्या दोन-तीन दिवसांत रस्ता नागरिकांसाठी खुला होणार
Pune news :पुणे: बिबवेवाडी-कोंढवा परिसरातील सर्व्हे नंबर ६३८, पीएमटी कॉलनी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची वाहतुकीची मोठी अडचण आता दूर होणार आहे.
1 मिनिट वाचन

Pune news : अमोल परदेशी व बापूशेठ नायर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जागामालक व विकसकाचे सामाजिक बांधिलकीतून सहकार्य
Pune news :पुणे: बिबवेवाडी-कोंढवा परिसरातील सर्व्हे नंबर ६३८, पीएमटी कॉलनी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची वाहतुकीची मोठी अडचण आता दूर होणार आहे. पीएमटी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यात अडथळा ठरत असलेली भिंत हटविण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून, या कामाचा औपचारिक शुभारंभ नुकताच नारळ फोडून करण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसांत ही भिंत पूर्णपणे हटवून हा महत्त्वपूर्ण रस्ता परिसरातील नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी खुला करण्यात येणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दीड वर्षांच्या लढ्याला अखेर यश
पीएमटी कॉलनीतील संबंधित भिंतीमुळे स्थानिक रहिवाशांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा आणि वळसा घालून जाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. ही भिंत हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गेल्या दीड वर्षांपासून तीव्र आंदोलन, विविध प्रशासकीय निवेदने आणि मागण्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. अमोल परदेशी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या पाठपुराव्याची मुख्य जबाबदारी स्वीकारून प्रशासकीय व स्थानिक पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते बापूशेठ नायर यांनी नागरिकांच्या हितासाठी मोलाची भूमिका बजावली, तर निलेश भाऊ बसवंत यांनी योग्य मध्यस्थी करत सकारात्मक मार्ग काढण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच सुरुवातीच्या काळात सचिन भाऊ जोगदंड यांचेही मोलाचे मार्गदर्शन या लढा उभारणीत लाभले होते.
हा रस्ता मोकळा करण्यासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्याकरिता जागामालक यशवंत शेठ कैंची, विकसक चेतन मोरे साहेब आणि मोरे-देशपांडे असोसिएशन यांनी विशेष सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला. समाजहिताचा विचार करून कोणत्याही कायदेशीर अथवा तांत्रिक अडचणी न आणता सहकार्य केल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
भिंत हटविण्याच्या कामाच्या शुभारंभाच्या वेळी समाजसेवक निलेश भाऊ बसवंत, बापूशेठ नायर, यशवंत शेठ कैंची, चेतन मोरे, राजू उडाणशिवे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता मोकळा होणार असल्याचे समजताच पीएमटी कॉलनीतील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला.
"नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि हक्काच्या रस्त्यासाठी सातत्याने संघर्ष करणे तसेच जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी आम्ही यापुढेही कायम कटिबद्ध राहू." — अमोल परदेशी (सामाजिक कार्यकर्ते)




