Pune Crime : बाणेर भागात पेन्शनकार्ड रजिस्ट्रेशनच्या नावाखाली ७० वर्षीय वृद्धाची सव्वाचार लाखांची फसवणूक
Pune Crime : पुणे: सायबर गुन्हेगारांनी आता वृद्ध नागरिकांना विविध प्रलोभने आणि बहाणे दाखवून गंडा घालण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
1 मिनिट वाचन

Pune Crime : पुणे: सायबर गुन्हेगारांनी आता वृद्ध नागरिकांना विविध प्रलोभने आणि बहाणे दाखवून गंडा घालण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० वर्षीय वृद्धाला पेन्शनकार्ड रजिस्ट्रेशन करण्याचे आमिष दाखवून तब्बल ४ लाख ८१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ७० वर्षांचे असून ते पाषाण-सूस रोड, पुणे येथे राहतात. दि. ०८ सप्टेंबर २०२६ ते दि. ०९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही ऑनलाइन फसवणुकीची घटना घडली. एका अज्ञात मोबाईलधारकाने फिर्यादी यांना फोन केला आणि तो बँक ऑफ बडोदा, हेड ऑफिस, बडोदा येथून बोलत असल्याची थाप मारली. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या पेन्शनकार्डचे रजिस्ट्रेशन करण्याचे काम असल्याचे भासवले.
या बहाण्याने वृद्धाला विश्वासात घेऊन वेगवेगळ्या प्रक्रियेच्या नावाखाली आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून एकूण ४,८१,००० रुपयांची रक्कम परस्पर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मोबाईलधारक, बँक खातेधारक व संबंधित वापरकर्त्यांविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी ॲक्ट) कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे करीत आहेत.




