काळेपडळमध्ये बोरवेलचा ट्रकने उघड्यावर झोपलेल्या तरुणाला चिरडले
मयत आणि फिर्यादी दोघेही बोअरवेल ट्रक असलेल्या कंपनीचे नोकर आहेत
2 मिनिट वाचन

मयत आणि फिर्यादी दोघेही बोअरवेल ट्रक असलेल्या कंपनीचे नोकर आहेत
पुणे: काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोकळ्या जागेत रात्री जमिनीवर झोपलेल्या ३६ वर्षीय तरुणाच्या डोक्यावरून आणि अंगावरून भरधाव बोरवेलचा ट्रक (क्रमांक- एमएच २१डी ३४०९) गेल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. ही भीषण आणि हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता. १९) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास संगम हॉस्पिटल रोडवरील हॉटेल आय सूट लक्सोरसमोरील मोकळ्या जागेत घडली.

विशाल सिंह मोहर सिंह (वय ३६, मूळ रा. छत्तीसगड) असे या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र पुष्पेन्द्रकुमार केहरसिंग मरावी (वय २६, मूळ रा. मध्यप्रदेश) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक माधव शिवाजी पवार (वय २८, रा. येवलेवाडी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १९९/१७७ आणि १३४(अ)(ब) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मैदानावर झोपला असताना घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पेन्द्रकुमार आणि मयत विशाल सिंह हे गुरुदत्त बोरवेलच्या ट्रकमध्ये काम करत होते. मंगळवारी रात्री त्यांनी त्यांचा ट्रक संगम हॉस्पिटल रस्त्यालगत असलेल्या भाऊ मासाळ यांच्या मोकळ्या जागेत उभा केला होता. उन्हाळ्याच्या रात्री उकाडा जास्त असल्याने विशाल सिंह हा केबिनमध्ये न झोपता मोकळ्या जागेत जमिनीवर उघड्यावर झोपला होता.
चालकाचे हलगर्जीपणाने वाहन चालवणे पडले महागात
मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास ट्रक चालक माधव पवार याने वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, कोणताही अंदाज न घेता आपला ट्रक हयगयीने आणि अविचाराने भरधाव वेगात चालवण्यास सुरुवात केली. अंधार असल्याने आणि चालकाने निष्काळजीपणा केल्याने, जमिनीवर झोपलेला विशाल सिंह हा चालकाच्या लक्षात आला नाही. चालकाने ट्रकचे अवजड चाक थेट विशाल सिंहच्या डोक्यावरून आणि अंगावरून घातले. या भीषण अपघातात विशाल गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस पुढील तपास करत आहेत
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. या अपघाताची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. निष्काळजीपणाने वाहनाचा वापर करून सहकाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक सध्या अटकेत नाही. पोलीस अंमलदार दिनेश रासकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे क्राईम न्युज




