मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा

Thane Crime News : मुंब्रा येथे गोवा बनावटीच्या अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; तब्बल 1 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला बेड्या

•पारसिक रेतीबंदर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सापळा; पंख्यांच्या सुट्ट्या भागांच्या आडून तस्करीचा प्रयत्न उधळला, 1235 बॉक्स विदेशी मद्य व आयशर ट्रक जप्त

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Thane Crime News

ठाणे / मुंब्रा :- राज्यात परराज्यातील बनावट व अवैध मद्य तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. कोकण विभागाच्या विभागीय भरारी पथकाने मुंब्रा येथील जुना मुंबई-पुणे रोडवरील पारसिक रेतीबंदर परिसरात सापळा रचून बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत वाहनासह तब्बल 1 कोटी 54 लाख 51 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

पंख्यांच्या सुट्ट्या भागांचा बनाव; 1235 बॉक्स विदेशी मद्य हस्तगत

मिळालेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पारसिक रेतीबंदर, मुंब्रा परिसरात परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. Thane Crime News त्यानुसार दुय्यम निरीक्षक व पथकाने सापळा रचला असता, चॉकलेटी व पांढऱ्या पट्टीचा एक सहाचाकी आयशर ट्रक (क्र. MH-25-AJ-5674) संशयास्पदरीत्या आढळून आला. पथकाने या वाहनाला अडवून चालकाकडे मालवाहतुकीबाबत विचारणा केली असता, त्याने ट्रकमध्ये पंखे आणि त्याचे सुट्टे भाग असल्याची बतावणी केली. मात्र, खात्रीलायक माहिती असल्याने पथकाने वाहनाची सखोल तपासणी केली असता, खाकी रंगाच्या बॉक्समध्ये गोवा राज्यात निर्मिती केलेल्या 180 मिली क्षमतेच्या बनावट मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर व कमाल किंमत नसलेल्या आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडचे एकूण 1235 बॉक्स (59,280 बाटल्या) पथकाने जप्त केले.

पुण्यातील आरोपीला अटक; दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी ट्रक चालक व आरोपी अभिषेक गणपत जगताप (वय 25 रा. माणदेवी मंदिराजवळ, माण कुंभारवस्ती, हिंजवडी रोड, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी मद्याचे 1235 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक असा एकूण 1 कोटी 54 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Thane Crime News राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि उपअधीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ आणि जवान हर्षल खरबस, एस. पी. राठोड, हनुमंत गाढवे, अमीत सानप यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली असून, दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा