युट्यूबर ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट; दिल्लीतील साकेत न्यायालयाचा आदेश
२०१८ मधील मानहानी प्रकरणात न्यायालयाची कारवाई; ‘भाजप आयटी सेल भाग २’ व्हिडिओवरून वाद, पुढील सुनावणी ३ डिसेंबरला
2 मिनिट वाचन

नवी दिल्ली : युट्यूबर ध्रुव राठी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१८ मधील बदनामीच्या एका फौजदारी खटल्याप्रकरणी दिल्लीतील साकेत न्यायालयाने सोमवारी (दि. २३) ध्रुव राठी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. न्यायालयात वारंवार हजर राहण्याचे निर्देश देऊनही ते सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
हे प्रकरण ध्रुव राठी यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलेल्या ‘भाजप आयटी सेल पार्ट-२’ या व्हिडीओशी संबंधित आहे. विकास संकृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी ध्रुव राठी यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली होती. या व्हिडीओमध्ये भाजपच्या आयटी सेलमधील काही लोकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राठी यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा संकृत्यायन यांनी केला होता.
या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वीही ध्रुव राठी यांना समन्स बजावले होते. मात्र, त्यांना नोटीस बजावण्यात वारंवार अडचणी येत होत्या. १७ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा जामीनपात्र वॉरंट काढून गुरुग्राम येथील पत्त्यावर ते बजावण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हे वॉरंटही बजावता आले नाही. अखेर सोमवारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचेही नाव आले होते. त्यांनी २०१८ मध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ शेअर करणे ही चूक असल्याचे मान्य केले होते. मात्र, ध्रुव राठी यांच्याविरोधातील मानहानीचा खटला सुरूच आहे. आता ३ डिसेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र मिरर




