शरद पवारांना NDA मध्ये घेण्यास भाजप सकारात्मक; महायुतीत चौथा मित्रपक्ष म्हणून सामावून घेण्याची तयारी?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या भाजप नेत्यांसोबत दिवाळीदरम्यान बैठका; अंतिम निर्णय मात्र शरद पवारांच्याच भूमिकेवर अवलंबून
2 मिनिट वाचन

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला NDA मध्ये सहभागी करून घेण्याबाबत भाजप सकारात्मक असल्याचे वृत्त समोर आले आहे. शरद पवार यांचा पक्ष महायुतीमध्ये चौथा मित्रपक्ष म्हणून सहभागी झाला, तरी भाजपला कोणतीही अडचण नसल्याचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस'ने २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेतृत्वाने भाजपच्या राज्यातील काही नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. या बैठकांमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या चर्चांनाही पुन्हा वेग आला आहे.
भाजपमधील एका वरिष्ठ मंत्र्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने NDA सोबत येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण व्हावे, अशी भाजपची सुरुवातीपासून इच्छा होती. मात्र, सत्तेतील वाटप आणि नेतृत्वाच्या प्रश्नांमुळे विलीनीकरण शक्य नसेल, तर स्वतंत्र मित्रपक्ष म्हणून त्यांना सोबत घेण्यासही भाजप तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणासमोर अनेक राजकीय अडचणी आहेत. पक्षाचे नेतृत्व कोणाकडे राहणार, पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाकडे असेल, तसेच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल, असे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याचेही वृत्त आहे. या भेटीत पक्षातील अंतर्गत मतभेद आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, शरद पवार स्वतः NDA मध्ये सहभागी होण्यास तयार आहेत का, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. NDA मध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला केंद्रातील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सध्या या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांतील पुढील चर्चा याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




