मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटनअजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर; सुप्रिया सुळे भावुककेरळ भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; पद्मिनी थॉमस यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी करणारभाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेक

फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का नाही?

खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल; महापुरुषांचे विचार केवळ भाषणापुरते न ठेवता आचरणात आणण्याचे आवाहन

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

 खासदार अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे

महाराष्ट्र, दि. २१ : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही, असा थेट सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार केवळ भाषणांमधून मांडण्यापेक्षा ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. मात्र, याबाबतीत सरकार आणि समाज म्हणून आपण कमी पडत आहोत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कोल्हे म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार सांगणे सोपे आहे; मात्र ते आचरणात आणणे अवघड आहे. सावित्रीबाईंचे कार्य सांगणे सोपे असले, तरी त्यांच्या विचारांनुसार वागणे कठीण आहे. महापुरुषांचे पुतळे उभारणे सोपे आहे; परंतु त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अधिक महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राला आजवर महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, ही बाबही या विचारांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करणारी आहे.

महापुरुषांच्या विचारांना जाती आणि धर्माच्या चौकटीत अडकवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक महापुरुषाच्या गळ्यात एका धर्माचा हार घालून त्यांना विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या व्यापक सामाजिक विचारांचा प्रसार होण्यास मर्यादा आल्या. महापुरुषांचे विचार संपूर्ण समाजासाठी होते, त्यांना कोणत्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित ठेवता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संसदेत महात्मा फुले यांची पगडी घालून आणि 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक घेऊन गेल्यानंतर महाराष्ट्रातील सहा खासदारांनी आपल्याला कोणती पगडी घातली, असा प्रश्न विचारल्याचा अनुभवही कोल्हे यांनी सांगितला. फुले यांच्या कार्याचा इतिहास केवळ पहिली मुलींची शाळा सुरू करण्यापुरता सांगितला जातो. मात्र, त्यांच्या पुढील सामाजिक कार्याचा आणि विचारांचा इतिहास व्यापकपणे समोर का आणला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महापुरुषांचे विचार केवळ जयंती, पुण्यतिथी आणि भाषणांपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक आणि राजकीय व्यवहारातही उतरवले पाहिजेत. स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि व्यापक समाजहिताच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली, तरच महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून समोर आला.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर