टोरेंट जलविद्युत प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद! सुनील तटकरेंची फेरविचाराची मागणी
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी आणि विरोधक आक्रमक; आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही प्रकल्पाला विरोध
2 मिनिट वाचन

मुंबई : भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित टोरेंट जलविद्युत प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाला निर्माण होणारा धोका यावरून ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसने यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला होता. आता या प्रकल्पावरून महायुतीमध्येही मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. टोरेंट जलविद्युत प्रकल्पासाठी सरकारने विविध परवानग्या मिळवल्या असल्या, तरी सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता राज्य सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तटकरे यांच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकल्पाला ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसराची पाहणी केली होती. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडली होती. दुसरीकडे, सरकारकडून प्रकल्पाचे समर्थन करताना वृक्षतोडीच्या बदल्यात लाखो झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
आता महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या अजित पवार गटानेही प्रकल्पाबाबत फेरविचाराची भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारकडून प्रकल्प योग्य असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे मित्रपक्षाकडूनच पर्यावरण आणि स्थानिकांच्या भावनांचा विचार करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे टोरेंट प्रकल्पाला सरकार हिरवा कंदील देणार की विरोध वाढत असल्याने पुनर्विचार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र मिरर




