पुण्यात ३१ किलोमीटरचे दोन नवे भुयारी मार्ग
‘पाताळ लोक’ प्रकल्पाला महापालिकेची गती; भोसरी ते उंड्री आणि भूगाव ते एरंडवणे जोडले जाणार; सविस्तर प्रकल्प आराखड्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराच्या नियुक्तीला आयुक्तांची मंजुरी
3 मिनिट वाचन

महत्वाचे मुद्दे
*या प्रकल्पामुळे शहराच्या उत्तर-दक्षिण आणि पश्चिम भागातील प्रवासाचा वेग वाढून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार
*यातील पहिला आणि सर्वात मोठा मार्ग शहराच्या उत्तर भागातील भोसरीला दक्षिण भागातील उंड्रीशी जोडणारा
*भोसरी-संगमवाडी-धोबीघाट (पुणे कॅन्टोन्मेंट)-कोंढवा आणि उंड्री या मार्गाची लांबी २३ किलोमीटर असेल
*भोसरी-उंड्री भुयारी मार्ग बोपदेव घाटातून पुढे नेऊन प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या ‘पाताळ लोक’ प्रकल्पांतर्गत दोन मोठ्या भुयारी मार्गांचे जाळे विणण्यात येणार आहे.
भोसरी ते उंड्री आणि भूगाव ते एरंडवणे या एकूण ३१ किलोमीटर लांबीच्या दोन प्रस्तावित भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यास महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या उत्तर-दक्षिण आणि पश्चिम भागातील प्रवासाचा वेग वाढून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे.
दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग
महापालिकेने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यानुसार, या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी कॉरिडॉरचा समावेश आहे. यातील पहिला आणि सर्वात मोठा मार्ग शहराच्या उत्तर भागातील भोसरीला दक्षिण भागातील उंड्रीशी जोडणारा असून, त्याची लांबी २३ किलोमीटर असेल. भोसरी-संगमवाडी-धोबीघाट (पुणे कॅन्टोन्मेंट)-कोंढवा आणि उंड्री असा या मार्गाचा प्रमुख प्रवास असेल.
विशेष म्हणजे, भविष्यात हाच भोसरी-उंड्री भुयारी मार्ग बोपदेव घाटातून पुढे नेऊन प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याचा मानस आहे. विमानतळापर्यंतच्या या विस्तारित मार्गाचे काम ‘महामेट्रो’कडून केले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि उत्तर पुण्यातील नागरिकांना थेट विमानतळापर्यंत विनाअडथळा भुयारी प्रवासाची सुविधा मिळू शकेल.
दुसरा प्रस्तावित भुयारी मार्ग शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आखण्यात आला आहे. भूगाव येथील राम नदीपासून ते एरंडवणे येथील डी. पी. रस्त्यापर्यंत हा आठ किलोमीटरचा सलग बोगदा असेल. राम नदी, डुक्कर खिंड आणि डी. पी. रोड अशी याची जोडणी असेल. डुक्कर खिंड परिसरातील भौगोलिक अडथळे पार करून पश्चिम पुण्यातील वाहतुकीला एक अत्यंत सक्षम पर्यायी मार्ग यातून उपलब्ध होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाताळ लोक’ या भुयारी वाहतूक प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. यापूर्वी प्रशासनाकडून येरवडा ते कात्रज दरम्यान भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, जागेची कमतरता, प्रकल्पाचा अवाढव्य खर्च आणि आधीच अस्तित्वात असलेला भूमिगत मेट्रो मार्ग यांमुळे तो प्रस्ताव तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरला. त्यानंतर वाहतूक तज्ज्ञांच्या सर्वेक्षणावरून हे नवे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यासोबतच, शहराच्या मध्यवर्ती भागातील कोंडी कमी करण्यासाठी स्वारगेट ते शनिवारवाडा दरम्यानच्या भुयारी मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निविदाही प्रसिद्ध केली आहे.
वाहतूक नियोजन करताना केवळ पुणे महापालिकेच्या हद्दीपुरता मर्यादित विचार न करता संपूर्ण महानगर प्रदेशाचा एकात्मिक दृष्टिकोन प्रशासनाने स्वीकारला आहे. त्यानुसार, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने या प्रकल्पाची प्रक्रिया सुरू केली आहे.
या दोन्ही मार्गांची आखणी करण्यापूर्वी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अत्यंत सखोल डेटा विश्लेषण केले आहे. यामध्ये ‘टॉमटॉम’चा (TomTom) प्रवास उगम आणि गंतव्य डेटा, गुगल ट्रॅफिकची माहिती, प्रत्यक्ष वेळेतील (रिअल-टाइम) वाहतूक नोंदी, सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) आणि नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. प्रमुख रस्त्यांवरील कोंडीची ठिकाणे आणि पर्यायी मार्गांची उपलब्धता तपासूनच हे मार्ग निश्चित केले गेले आहेत.
केवळ स्वतंत्र बोगदे उभारण्याऐवजी शहरातील इतर मोठ्या वाहतूक प्रकल्पांचे एकमेकांशी जोडलेले जाळे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक अहवालानुसार, हे दोन्ही भुयारी मार्ग प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), अंतर्गत रिंग रोड आणि बाह्य रिंग रोड यांच्याशी संलग्न असतील. तसेच, अस्तित्वात असलेल्या आणि प्रस्तावित मेट्रो सेवांना हे भुयारी रस्ते पूरक ठरतील. तज्ज्ञ सल्लागाराकडून तयार होणाऱ्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे निष्कर्ष, पर्यावरण व संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि अंतिम प्रशासकीय मंजुरीनंतर या ३१ किलोमीटरच्या भुयारी जाळ्याच्या प्रत्यक्ष कामाला दिशा मिळणार आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




