गांधी कुटुंबावरील पोस्ट कंगना राणावत यांना भोवली; शिमला पोलिसांकडून गुन्हा दाखल
सोनिया गांधींबाबतच्या विधानांवर आक्षेप; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची पोलिसांकडे तक्रार, BNSच्या तीन कलमांनुसार कारवाई
2 मिनिट वाचन

शिमला : सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत अडचणीत आल्या आहेत. गांधी कुटुंबाबाबत केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या विधानांवरून हिमाचल प्रदेशातील शिमला पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या उल्लेखांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
कंगना राणावत यांनी १० नोव्हेंबर रोजी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) खात्यावर गांधी कुटुंबाशी संबंधित एक जुना व्हिडीओ आणि काही पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मृत्यूंचा संदर्भ देण्यात आला होता. तसेच सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासाबाबतही विधान करण्यात आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये सोनिया गांधी यांचा उल्लेख ‘रहस्यमय परदेशी नागरिक’ असा करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. शिमला येथील रहिवासी आणि निवृत्त कॅप्टन अतुल शर्मा यांनी १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालकांकडे ई-मेलद्वारे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराचे नेमके आरोप काय?
संबंधित सोशल मीडिया पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसेच सार्वजनिक शांतता आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचे अतुल शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या पोस्टची सत्यता, मूळ संदर्भ आणि डिजिटल माध्यमातून झालेला प्रसार यांची सायबर फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
BNSच्या तीन कलमांनुसार गुन्हा दाखल
या तक्रारीच्या आधारे शिमला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १९६, ३५३ आणि ३५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांचा संबंध विविध गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवू शकणारी विधाने किंवा अफवा पसरवणे आणि मानहानी यांच्याशी आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून संबंधित सोशल मीडिया पोस्टची सत्यता, त्यातील मजकूर आणि त्याच्या कायदेशीर परिणामांची तपासणी केली जात आहे. या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र मिरर




