वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरोग्यमंत्र्यांचा पुढाकार; विशेष समिती गठित
कामाचे तास, डीएसीपी योजना आणि कल्याण निधीबाबत समिती करणार सविस्तर अभ्यास
2 मिनिट वाचन

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांच्या विविध मागण्यांची दखल घेत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष समिती गठित केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती. या चर्चेच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाने समिती गठित केली आहे.
या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करण्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासन आणि इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या डायनॅमिक अॅश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन (DACP) योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत. याशिवाय, गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कल्याण निधी योजना तयार करण्याच्या दृष्टीने तिची रचना, कार्यकक्षा, आर्थिक तरतूद, लाभांचे स्वरूप आणि अंमलबजावणीची पद्धत यांचा सविस्तर अभ्यास समिती करणार आहे.
या समितीचे अध्यक्ष म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट-अ (मॅग्मो) यांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वैद्यकीय अधिकारी हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सेवाविषयक अडचणी, कामाचा ताण, करिअरमधील प्रगती आणि कल्याणाशी संबंधित प्रश्नांचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संघटनेच्या मागण्यांची दखल घेत समिती गठित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या सेवाविषयक प्रश्नांवर धोरणात्मक तोडगा काढण्याचा या समितीचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढण्यास आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र मिरर




