दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यात
४० जणांची ड्रग्ज चाचणी; दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन
1 मिनिट वाचन

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या मुंबईतील कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) कारवाई केली. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या संशयावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी पथकाकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान विशेष व्हॅनच्या माध्यमातून उपस्थितांची तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण ४० जणांची ड्रग्ज चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोन जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने तातडीने ताब्यात घेतले. पुढील चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दरम्यान, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत. दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टदरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कार्यक्रमस्थळी सुरक्षा आणि तपासणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्र मिरर




