मुंबईठाणे
Trending

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार! वरळीच्या अधिवेशनात ‘सुनेत्रा पर्वा’चा उदय; पार्थ पवारही राज्यसभेच्या वाटेवर

Sunetra Pawar Latest News : अजितदादांच्या निधनानंतर पक्षाची धुरा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती | प्रफुल्ल पटेल यांनी केली नावाची घोषणा | बारामती पोटनिवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांचा ‘बिनविरोध’साठी सकारात्मक संकेत

मुंबई :- 26 फेब्रुवारी 2026 हा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. वरळी येथील ‘डोम’मध्ये रंगलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून पक्षाने आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत, स्वाभिमानी अस्तित्वाचा हुंकार या निवडीतून देण्यात आला आहे.

प्रफुल्ल पटेलांनी मांडला प्रस्ताव

अधिवेशनादरम्यान पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली. या प्रस्तावाला उपस्थित सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभे राहून आणि टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला. या निवडीनंतर पक्षात आता नवी जबाबदारीची वाटणी झाली आहे:

राष्ट्रीय अध्यक्ष: सुनेत्रा पवार

कार्यकारी अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष: खासदार सुनील तटकरे

बारामती पोटनिवडणूक आणि सुप्रिया सुळेंचे विधान

अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास व्यक्त केल्याने सुनेत्रा पवार यांचा बारामतीचा मार्ग सुकर झाला असल्याचे दिसते. तसे झाल्यास सुनेत्रा पवार लवकरच बारामतीच्या आमदार म्हणून विधीमंडळात दिसतील.

पार्थ पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी

पवार कुटुंबातील तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात मोठ्या पदावर दिसणार आहे. अजितदादांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यांच्यावर पक्षाकडून मोठी संघटनात्मक जबाबदारीही दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अजितदादांच्या गटातील वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याला प्राधान्य दिले. सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून झालेली निवड हा त्याच रणनीतीचा एक भाग मानला जात आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button