Mumbai News : ‘चिरनेरच्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील नोंदीसाठी लाचखोरी; 1 लाखाची लाच घेणारा उरणचा मंडळ अधिकारी अन् तलाठी एसीबीच्या जाळ्यात!’
Mumbai News :’नवी मुंबई एसीबीचा चौक (उरण) येथे थरारक सापळा; महिला खाजगी मदतनिसासह तिघे जण रंगेहात गजाआड’
Mumbai News :नवी मुंबई/रायगड :- जमिनीच्या 7/12 (सातबारा) उताऱ्यावर मयत बहिणीच्या वारसांची नोंद करण्यासाठी आणि मयत भावाचे नाव कमी करण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महसूल विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांचा अन् त्यांच्या महिला मदतनिसाचा नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पर्दाफाश केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चौक आणि चिरनेर परिसरात एसीबीच्या पथकाने टाकलेल्या धडक सापळ्यात मंडळ अधिकारी, तलाठी आणि त्यांची खाजगी महिला मदतनीस रंगेहात जाळ्यात अडकले आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news
याप्रकरणी एसीबीने केशव दगडू मोहिते (वय 52, मंडळ अधिकारी – चौक, ता. उरण), जयहिंद बिरश कोळी (वय 49, तलाठी – सजा चिरनेर, ता. उरण) आणि लाचेची रक्कम स्वीकारणारी खाजगी महिला मदतनीस मोनिका कल्पेश पाटील (वय 36) या तिघांना ताब्यात घेतले असून उरण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
‘1 लाखांची लाच अन् एसीबीचा सापळा’
एसीबीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 52 वर्षीय तक्रारदाराने आपल्या मामा, मावशी, भाऊ व बहिणीच्या नावावर असलेल्या मौजे चिरनेर येथील सामायिक जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर मयत बहिणीच्या वारसांची नोंद करण्यासाठी आणि मयत भावाचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता. या नोंदणीच्या शासकीय कामासाठी मंडळ अधिकारी केशव मोहिते आणि तलाठी जयहिंद कोळी यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 1 ऑक्टोबर 2026 रोजी नवी मुंबई एसीबी कार्यालयात धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. 5 ऑक्टोबर रोजी एसीबीने या तक्रारीची अत्यंत गुप्तपणे पडताळणी केली असता, शासकीय पंचांसमक्ष मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी 1 लाखाची लाच मागितल्याचे आणि तलाठी जयहिंद कोळी यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
‘चौक कार्यालयात रंगेहात कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल’
पडताळणीनंतर 6 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी एसीबीच्या पथकाने उरण येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. लाचेची रक्कम घेऊन गेलेल्या तक्रारदाराला मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी ही रक्कम आपली खाजगी महिला मदतनीस मोनिका पाटील हिच्याकडे देण्यास सांगितले.जशी 1 लाखाची लाचेची रक्कम मोनिका पाटील हिने स्वीकारली, तसा दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दुपारी तिला लाचेच्या रोकडसह रंगेहात पकडले. त्यानंतर लागलीच कारवाई करत दुपारी तलाठी जयहिंद कोळी यालाही ताब्यात घेण्यात आले.
‘वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी’
ही यशस्वी आणि धडाकेबाज कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई एसीबीच्या पोलीस निरीक्षक अरुंधती येडगे, पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके व त्यांच्या अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.
