मुंबई

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ; आता 3 ऐवजी 6 अंगरक्षकांचा गराडा

•महापालिका आयुक्तांकडून मागणी मंजूर; मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना मिळणार इतकी कडेकोट सुरक्षा

मुंबई :- मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कधी लाल दिवा तर कधी महागड्या घड्याळामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या महापौरांच्या सुरक्षेबाबत आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौरांच्या विनंतीवरून प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता त्यांच्या दिमतीला 24 तास एकूण 6 सुरक्षा रक्षक तैनात असतील.

सुरक्षेच्या नियमात ऐतिहासिक बदल

मुंबई महापालिकेच्या आतापर्यंतच्या परंपरेनुसार, महापौरांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शिफ्टला एक याप्रमाणे एकूण तीन सुरक्षा रक्षक पुरवले जात असत. मात्र, रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून अतिरिक्त सुरक्षेची गरज व्यक्त केली होती. प्रशासनाने ही मागणी मान्य केल्याने आता प्रत्येक शिफ्टला दोन याप्रमाणे एकूण सहा अंगरक्षक त्यांच्यासोबत असतील. मुंबईच्या नागरी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महापौरांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा कवच पुरवले जात आहे.

वाढत्या जनसंपर्काचे दिले कारण

महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून रस्ते, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या प्रश्नांवर थेट वस्त्यांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे त्यांच्याभोवती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळते.

गजबजलेल्या ठिकाणी दौऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जुनी सुरक्षा यंत्रणा अपुरी पडत असल्याची बाब समोर आली.

गर्दीच्या ठिकाणी कोणतीही अघटित घटना घडू नये आणि महापौरांची सुरक्षितता अबाधित राहावी, या उद्देशाने ही अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टीका आणि सक्रियता

एककीकडे रितू तावडे यांच्या ‘लाईफस्टाईल’वरून विरोधकांकडून टीका होत असताना, दुसरीकडे त्या अत्यंत सक्रियपणे मैदानावर उतरून काम करत आहेत. आता या वाढीव सुरक्षेमुळे त्या मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक जोमाने कार्य करू शकतील, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, महापौरांना दिल्या जाणाऱ्या या विशेष वागणुकीवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button