Pune Crime News : बिबवेवाडी टेकडीफोड प्रकरणी संजय मेहता-अनिल ललवानी यांच्याविरुद्ध गुन्हा
हिलव्हिव्यू परसेप्ट रिअॅलिटी, स्टार कन्स्ट्रक्शन आणि प्राईम अक्षर एलएलपीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; परंतु फिर्यादीतून आणखी एका व्यक्तीचे नांव वगळले असल्याची चर्चा
हिलव्हिव्यू परसेप्ट रिअॅलिटी, स्टार कन्स्ट्रक्शन आणि प्राईम अक्षर एलएलपीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; परंतु फिर्यादीतून आणखी एका व्यक्तीचे नांव वगळले असल्याची चर्चा | Pune Crime News
पुणे, प्रतीक्षा पारखी: Pune Crime News | शहरातील व उपनगरांतील टेकड्यांवर विनापरवाना उत्खनन करून दगड, डबर काढून टेकड्यांचे सपाटीकरण करण्याच्या प्रकारांना ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी येथील मुंजेरी टेकडीवर विनापरवाना टेकडीफोड करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी हिलव्हिव्यू व परसेप्ट रिअॅलिटी, स्टार कन्स्ट्रक्शन आणि प्राईम अक्षर एलएलपीच्या संबंधित व्यक्तींविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (maharashtra mirror)
या प्रकरणी पुणे शहर तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) स्मिता सचिन आवनकर (वय ४२, रा. धनकवडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हिलव्हिव्यू परसेप्ट रिअॅलिटी, स्टार कन्स्ट्रक्शन आणि प्राईम अक्षर एलएलपीतर्फे संजय मेहता आणि अनिल ललवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, फिर्यादीतून आणखी एका व्यक्तीचे नांव वगळले असल्याची चर्चा आहे. (maharashtra mirror news)
मुंजेरी टेकडीवर विनापरवाना उत्खनन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील सर्व्हे क्रमांक ५७९/१अ, ५७९/१ब आणि ५८० पी तसेच संबंधित सिटी सर्व्हे क्षेत्र हे सुमारे १ हेक्टर ५८ आर क्षेत्रफळाचे असून, तेथे तीव्र उताराची टेकडी आहे. या टेकडीवर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता उत्खनन आणि टेकडीफोड करण्यात आल्याचा आरोप आहे. टेकडी फोडताना तेथील दगड व डबर काढून परिसराचे सपाटीकरण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (maharashtra mirror)
नोटिशीला दाखवली केराची टोपली
टेकडीफोडीची माहिती मिळाल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी स्मिता आवनकर यांनी संबंधितांना नोटीस बजावून काम थांबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून संबंधितांकडून टेकडीफोडीचे काम सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या कामामुळे परिसरातील नैसर्गिक भूभाग आणि पर्यावरणाला हानी पोहोचल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (maharashtra mirror news)
पर्यावरण आणि खाण-कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी पर्यावरण संरक्षणाशी संबंधित कायदे तसेच खाण व खनिजविषयक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चिनके करीत आहेत. टेकडीफोडीसाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री, उत्खननातून काढण्यात आलेल्या दगड-डबराची विल्हेवाट, संबंधित परवानग्या तसेच या कामामागील नेमकी जबाबदारी याबाबत पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून तपास करण्यात येत आहे. (maharashtra mirror news)
जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलावर परिणाम
पुणे शहराच्या आसपासच्या टेकड्यांवर बेकायदा उत्खनन करून नैसर्गिक डोंगररांगा सपाट करण्याचे प्रकार यापूर्वीही चर्चेत आले आहेत. टेकडीचा नैसर्गिक भूभाग बदलल्यानंतर या जागांवर बांधकामे आणि मोठ्या इमारती उभारल्या जात असल्याने शहरातील हरित क्षेत्र, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलावर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंजेरी टेकडीवरील कारवाईमुळे अशा प्रकारच्या विनापरवाना टेकडीफोडीकडे प्रशासन आणि पोलिसांचे लक्ष पुन्हा वेधले गेले आहे. (maharashtra mirror news)
महत्वाचे मुद्दे
- मुंजेरी टेकडीवर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता उत्खनन आणि टेकडीफोड करण्यात आल्याचा आरोप आहे
- टेकडी फोडताना तेथील दगड व डबर काढून परिसराचे सपाटीकरण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद
- पर्यावरण संरक्षणाशी संबंधित कायदे तसेच खाण व खनिजविषयक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल
- ग्राम महसूल अधिकारी यांनी संबंधितांना नोटीस बजावून काम थांबविण्याचे निर्देश दिले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून संबंधितांकडून टेकडीफोडीचे काम सुरूच ठेवल्याचा आरोप


