Crop Insurance News :पीक विमा योजनेत जुलैअखेरपर्यंत सहभाग घेता येणार

अॅग्रिस्टँक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक
पुणे, महाराष्ट्र मिरर Crop Insurance News : सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना जुलैअखेरपर्यंत म्हणजेच ३१ तारखेपर्यंत सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टँक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक आहे. Crop Insurance News

खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व खरीप कांदा या १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. केंद्र शासनाच्या https://pmfby.gov.in पीक विमा पोर्टलवर शेतकरी स्वत: ऑनलाईन अर्ज भरू शकतात. किंवा ई-सेवा केंद्रास (सीएससी), बँक वा वित्तीय संस्थेची मदत घेऊ शकतात. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ई-सेवा केंद्रास ४० रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत ई-सेवा केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क अदा करु नये.
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टँक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के विमा हप्ता भरून सहभाग नोंदवावा लागेल. कापूस व कांदा या व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के राहील. डिजिटल क्रॉप सर्वेतील पीक व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल व तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल.Crop Insurance News
योजनेत भाग घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे. बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास अशा अर्जदारास काळ्या यादीत टाकून पुढील किमान पाच वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांनी नजिकचे कृषी कार्यालय अथवा विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा सुधारित शासन निर्णय तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही विभागीय कृषी सहसंचालक जेजूरकर यांनी कळविले आहे.Crop Insurance News
या कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे योजना
पुणे विभागातील पुणे, सोलापूर जिल्ह्यात एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

