मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “खरातचे ‘भक्त’ मंत्रीच सहआरोपी करा!”; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती प्रहार

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मंत्रिमंडळातील ९ माजी आणि विद्यमान मंत्र्यांचा भोंदूबाबाला राजाश्रय; ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांचा बळी घेतल्याचा खळबळजनक दावा

मुंबई :- नाशिकच्या वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या सेक्स स्कँडल प्रकरणावरून राज्यातील राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. “अशोक खरातला राजाश्रय देणारे 9 माजी मंत्री आणि काही विद्यमान मंत्री आजही मंत्रिमंडळात बसलेले आहेत, त्यांना या प्रकरणात सहआरोपी करा,” अशी आक्रमक मागणी राऊतांनी केली आहे.संजय राऊत यांनी या प्रकरणातील ‘व्हीआयपी’ भक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले.

मंत्र्यांची चौकशी आणि सहआरोपी करण्याची मागणी

संजय राऊत म्हणाले की, “मंत्रिमंडळातील साधारण 9 माजी मंत्री आणि काही विद्यमान मंत्री या ढोंगी बाबाचे कट्टर समर्थक आहेत. या सर्वांना खरातच्या काळ्या कर्तृत्वाची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. केवळ राजकारण करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा (रुपाली चाकणकर) राजीनामा घेतला गेला, कारण त्या ‘सॉफ्ट टार्गेट’ होत्या. पण खरातला बळ देणारे खरे सूत्रधार अद्याप सत्तेत सुरक्षित आहेत.”

देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा

महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा दाखला देत राऊतांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली. “महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजपने अनेक बुवांना राजकारणात आणले आहे. खरात बाबांनाही उद्या भाजपमध्ये घेऊन ‘शुद्ध’ केले जाईल, अशी भीती वाटते. तुम्ही मंत्री असताना तुमचा स्वतःवरचा विश्वास इतका कसा ढेपाळला की तुम्हाला अशा भोंदूचा आधार घ्यावा लागला?” असा बोचरा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.

कॅबिनेट उपसमिती आणि ‘राजाश्रय’

अशोक खरातच्या संस्थांना सरकारी मदत कशी मिळाली, याबाबतही राऊतांनी गौप्यस्फोट केला. “अशोक खरातला कोणत्या साली आणि कोणत्या कॅबिनेटने पाणी दिले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. कॅबिनेटच्या एका उपसमितीने त्याला बळ दिले होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदार विधान करणे अपेक्षित आहे, पण ते केवळ कोणाला तरी वाचवण्यासाठी ‘आधीच्या सरकारने हे केले’ असे थोतांड सांगत आहेत,” असा आरोप राऊतांनी केला.

मंत्र्यांसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर’ घेण्याचा टोला

अशोक खरातचे फोटो देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत असल्याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. “विखे पाटील तर पाटावर बसून विधी करतात, मी त्या वैयक्तिक गोष्टीत जात नाही. पण तुमच्या मंत्रिमंडळातील जे भक्तगण तिथे रांगा लावून उभे होते, त्यांच्यासाठी फडणवीसांनी एखादे प्रबोधन शिबीर घ्यावे. या संवेदनशील विषयात राजकारण करू नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button