Mumbai News : 25 हजार रुपये दिवाळी भेट आणि थकबाकीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची आक्रमक भूमिका; 3 नोव्हेंबरपासून राज्यभर निदर्शने

Mumbai News : मुंबई :- राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि प्रशासकीय मागण्या दिवाळीपूर्वी मार्गी न लागल्यास 5 नोव्हेंबरपासून राज्यभरातील सर्व आगार आणि विभागीय कार्यालयांसमोर अविरत धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे. या आंदोलनापूर्वी 3 नोव्हेंबरला राज्यभर घंटानाद व निदर्शने, तर 4 नोव्हेंबरला द्वारसभा आयोजित करण्यात येणार असून 2 नोव्हेंबरपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन संघटनेने प्रशासनाला केले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
25 हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्याच्या थकबाकीची प्रमुख मागणी
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये दिवाळी भेट आणि 12 हजार 500 रुपये सण उचल देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन 2 नोव्हेंबर रोजी अदा करावे, 2016 पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची थकबाकी, तसेच 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने देण्यात यावी. जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्याबरोबरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या नोटीसमध्ये केली आहे.
प्रशासकीय धोरणे आणि कंत्राटी भरतीविरोधात आक्रमक पवित्रा
आर्थिक मागण्यांव्यतिरिक्त प्रशासकीय धोरणांवरही नाराजी व्यक्त करत, एनसीएमसी (NCMC) कार्डमधील त्रुटी दूर करणे, आगारांमध्ये टॉप-अप सुविधा उपलब्ध करणे, कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करणे आणि कंत्राटी कामगार भरती बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाडेतत्त्वावरील ई-बसचे करार रद्द करून स्वमालकीच्या बस बांधणे, महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती रजेबाबतचे जाचक परिपत्रक रद्द करणे आणि कर्मचाऱ्यांवरील कठोर निलंबनाची कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 5 नोव्हेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.