
Mumbai Mhada Room : भायखळा, लोअर परळ आणि वडाळ्यात हक्काच्या घराची संधी; फॉकलंड रोडवर सर्वाधिक 103 घरे, किंमती कोटींच्या घरात असण्याची शक्यता
मुंबई :- मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने (MHADA) मोठी खुशखबर आणली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या 2500 घरांच्या आगामी सोडतीत आता दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या 143 घरांचा समावेश झाला आहे. ही घरे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून (दुरुस्ती मंडळ) प्राप्त झाली असून, यामध्ये अत्यल्प गटापासून ते उच्च उत्पन्न गटापर्यंतच्या घरांचा समावेश आहे.
कुठे आणि किती आकाराची आहेत घरे?
दुरुस्ती मंडळाने मुंबई मंडळाकडे वर्ग केलेल्या या 143 घरांमध्ये विविध क्षेत्रफळांचे पर्याय उपलब्ध आहेत:
फॉकलंड रोड: सर्वाधिक 103 घरे याच परिसरात असून, त्यांचे क्षेत्रफळ अंदाजे 400 चौ. फूट आहे. ही घरे प्रामुख्याने अत्यल्प गटासाठी असतील.
वडाळा: येथे अंदाजे 20 घरे उपलब्ध असून, त्यांचे क्षेत्रफळ 400 ते 700 चौ. फुटांपर्यंत आहे.
माझगाव: 400 ते 650 चौ. फुटांच्या घरांचा समावेश आहे.
शिवडी आणि इतर: उच्च उत्पन्न गटासाठी 11 मोठी घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांचे क्षेत्रफळ 900 ते 1300 चौ. फुटांपर्यंत आहे.
किंमतींचे गणित: कोटींच्या घरात?
ही घरे भायखळा, लोअर परळ, वडाळा आणि माझगाव यांसारख्या दक्षिण मुंबईतील प्रीमियम भागात असल्याने त्यांच्या किंमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“दुरुस्ती मंडळाकडून मिळालेली ही घरे मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यांच्या किंमती निश्चित करण्याचे धोरण वेगळे असल्याने, मोठ्या क्षेत्रफळाच्या घरांच्या किंमती कोटींच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे,” असे सूत्रांकडून समजते. सध्या मुंबई मंडळ या घरांच्या अंतिम किंमती निश्चित करण्याचे काम करत आहे.
दुरुस्ती मंडळाकडून घरे कशी उपलब्ध झाली?
दक्षिण मुंबईतील जुन्या (उपकरप्राप्त) इमारतींच्या पुनर्विकासातून विकासकांकडून म्हाडाला ‘सरप्लस’ (अतिरिक्त) घरे मिळतात. यातील मोठी घरे घेण्यासाठी ‘बृहतसूची’वरील (Master List) लाभार्थी कमी असतात. त्यामुळे ही हक्काची घरे सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या मुख्य सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोडतीची वैशिष्ट्ये
1.क्षेत्रफळ: 400 चौ. फुटांपासून ते थेट 1300 चौ. फुटांपर्यंतचे पर्याय.
3.उत्पन्न गट: अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही गटांसाठी संधी.
3.प्रक्रिया: लवकरच या घरांच्या किंमती आणि जाहिरात म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
