
Anjali Damania On Rupali Chakankar : केक भरवताना आणि पाय पडतानाचे 4 नवे फोटो व्हायरल; नाशिकच्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई :- गुंगीचे औषध देऊन महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या प्रकरणाने आता राजकीय वादळाचे रूप धारण केले आहे. बुधवारी खरातला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या अटकेपेक्षाही आता खरातचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध अधिक चर्चेत आले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अत्यंत जवळीक दर्शवणारे चार नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चाकणकर या खरातला केक भरवताना, त्याचे पाय पडताना आणि एकमेकांचा हात पकडलेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना दमानिया यांनी संताप व्यक्त केला असून, “अशा ‘Epstein’ बाबांवर इतकी मेहेरबानी? या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत का? त्यांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
या वादग्रस्त फोटोंमुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुखच जर अशा भोंदू बाबांच्या पाद्यपूजा करत असतील, तर पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. खरातवर अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असून, पोलीस त्याच्या अश्लील व्हिडिओंच्या रॅकेटचा आणि त्याला संरक्षण देणाऱ्या राजकीय पाठबळाचा सखोल तपास करत आहेत.
