कोल्हापूर

Sugarcane Price Protest : ऊसदर आंदोलनाचा आज तिसरा दिवस; राजू शेट्टी आक्रमक, मागण्या मान्य न झाल्यास उद्या ‘तीन जिल्हा बंद’ची हाक

•पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी व नागठाण्यात ठिय्या आंदोलन तीव्र; 4,500 रुपयांच्या पहिल्या उचलीवर शेतकरी संघटना ठाम, प्रशासनासोबत तोडग्यासाठी बैठका सुरु

कोल्हापूर :- पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या योग्य दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. कोल्हापूरमधील किणी टोलनाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी तीव्र चक्काजाम व ठिय्या आंदोलन छेडले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या विनंत्या धुडकावून लावत शेतकरी रात्रीचा मुक्कामही रस्त्यावरच करत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेमक्या मागण्या काय?

या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये चालू गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन किमान 4,500 रुपये पहिली उचल मिळावी आणि त्यानंतर अंतिम दर म्हणून 500 रुपये मिळावेत, यावर शेतकरी संघटना ठाम आहे. साखरेचे वाढलेले बाजारभाव, इथेनॉल निर्मितीपासून कारखान्यांना होणारे अतिरिक्त उत्पन्न आणि राज्य सहकारी बँकेने साखरेचे केलेले 4,200 रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन लक्षात घेता, कारखानदार ही पहिली उचल सहज देऊ शकतात, असा युक्तिवाद राजू शेट्टी यांनी केला आहे. कारखानदार आणि शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे.

तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय हालचाली आणि आगामी इशारा

वाहतूक कोंडी आणि निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंत्र्यांच्या पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चेची तयारी दर्शवत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सायंकाळपर्यंत ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्यास उद्या (6 नोव्हेंबर रोजी) कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला हा बंद अत्यंत शांततापूर्ण मार्गाने पाळला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button