मुंबई

Tukaram Munde : दिवाळीत मिठाई खरेदी करताना तुकाराम मुंढेंचा कडक इशारा; भडक रंग आणि बनावट खवा ओळखण्याची ‘ही’ आहेत लक्षणे

*दोन-तीन दिवसांपेक्षा जुनी मिठाई टाळण्याचे आणि लेबल पाहूनच खरेदी करण्याचे FDA आयुक्तांचे नागरिकांना आवाहन; बनावट चांदीच्या वर्खाबाबतही सावध राहण्याच्या सूचना

मुंबई :- दिवाळीच्या सणात मिठाई आणि खव्याची मोठ्या प्रमाणावर होणारी विक्री पाहता, अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सावधगिरीचा इशारा दिला आहे. सण-सुदीच्या काळात बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त आणि जुन्या मिठाईमुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. नामांकित ब्रँड्स आणि उत्पादनाची तारीख व लेबल स्पष्ट असलेल्या ठिकाणांहूनच मिठाई व खवा खरेदी करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बनावट आणि भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची?

बाजारामध्ये मिळणारी बनावट मिठाई किंवा खवा ओळखण्यासाठी तुकाराम मुंढेंनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत:

भडक रंग टाळा: ज्या मिठाईवर खूप जास्त किंवा भडक रंगांचा वापर केला आहे, अशा मिठाई खरेदी करणे टाळावे.

उत्पादनाची तारीख तपासा: पाकिटावर किंवा बॉक्सवर मिठाई अथवा खव्याच्या निर्मितीची तारीख (Manufacturing Date) नमूद केलेली असेल, तरच ती खरेदी करावी. दोन किंवा तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुकानात पडून राहिलेला खवा किंवा मिठाई घेणे टाळावे.

चांदीचा वर्ख तपासा: मिठाईवर लावलेला चांदीचा वर्ख अस्सल आहे की बनावट, हे तपासण्यासाठी तो हातात घेऊन चोळून पाहावा. जर वर्ख हातात विरघळला, तर तो योग्य आहे; मात्र जर त्याची बारीक फॉइल किंवा कागदासारखी पट्टी तयार झाली, तर तो अल्युमिनियम फॉइल असू शकतो, त्यामुळे अशा मिठाईबाबत विशेष काळजी घ्यावी.

प्रशासनाची धडक कारवाई आणि कडक भूमिका

नागरिकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी FDA ने राज्यभरात विशेष मोहीम हाती घेतली असून मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाची मिठाई विकणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, जर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या भेसळीबाबत शंका किंवा संशय असेल, तर त्यांनी तात्काळ याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला द्यावी, जेणेकरून तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button