पुणेपिंपरी चिंचवड

Mumbai News : दिवाळीत मिठाई खरेदी करताना सावधान! भेसळ ओळखण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या महत्त्वाच्या सूचना

Mumbai News :मुदतबाह्य खवा, भडक रंगाच्या मिठाईपासून दूर राहण्याचे आवाहन; गिफ्ट हॅम्पर, चॉकलेट आणि केकचे लेबल तपासण्याचा सल्ला

Mumbai News :मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मिठाई, खवा, दूध, खाद्यतेल आणि विविध दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र, या काळात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर तपासणी आणि कारवाई तीव्र केली आहे. ग्राहकांनी मिठाई किंवा अन्य खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी राज्यातील विविध ठिकाणी दूध, खाद्यतेल, खवा, मिठाई, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा नियमबाह्य प्रकार आढळल्यास नागरिकांनी FDA कडे तक्रार करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले..https://maharashtramirror.com/ Mumbai news


मिठाई खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा


सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे आवश्यक आहे. FDA च्या सूचनांनुसार, वैध परवाना असलेल्या दुकानातूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. गरजेपुरतीच मिठाई आणावी. दोन दिवसांत संपेल एवढाच साठा खरेदी करावा. आठ दिवस पुरेल इतकी मिठाई एकाच वेळी घेऊन फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे खवा खरेदी करताना त्यावरील लेबल, उत्पादनाची माहिती आणि मुदत तपासावी. लेबल नसलेला किंवा मुदत संपलेला खवा खरेदी करू नये. तसेच अतिशय स्वस्त दरात मिळणाऱ्या आणि भडक रंग असलेल्या मिठाईबाबतही ग्राहकांनी सतर्क राहावे.


दूध, तूप आणि खाद्यतेलाबाबतही खबरदारी


दूध खरेदी करताना सुटे किंवा कच्चे दूध घेण्याऐवजी पॅकबंद दूध घेण्याचा सल्ला FDA ने दिला आहे. तूप आणि खाद्यतेलामध्ये प्राण्यांची चरबी किंवा अन्य रासायनिक पदार्थांची भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार करताना तळणीसाठी वापरलेले तेल वारंवार वापरू नये. लाडू किंवा अन्य मिठाईमध्ये कृत्रिम रंगांचा अतिरिक्त वापर टाळावा. नैसर्गिक रंगांचाही वापर नियमांनुसार मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करून तयार केलेले भडक रंगांचे खाद्यपदार्थ प्रशासनाकडून नष्ट करण्यात आल्याची माहितीही मुंढे यांनी दिली.
मिठाईवरील चांदीचा वरक खरा आहे का, हे तपासा
मिठाई आकर्षक दिसण्यासाठी त्यावर चांदीचा वरक लावला जातो. मात्र, चांदीच्या वरकाऐवजी ॲल्युमिनियमचा वापर केला जात असल्याच्या शक्यतेबाबत FDA ने इशारा दिला आहे. मिठाईवर वापरण्यात येणारा वरक शुद्ध चांदीचाच असावा. त्याऐवजी ॲल्युमिनियम वापरणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गिफ्ट बॉक्स, केक आणि चॉकलेट खरेदी करताना लेबल तपासा
दिवाळीच्या काळात गिफ्ट हॅम्पर, मिठाईचे बॉक्स, चॉकलेट, केक आणि मोदक भेट देण्याचे प्रमाण वाढते. अशा वस्तू खरेदी करताना त्यावरील उत्पादनाची माहिती, पॅकिंग आणि मुदतबाह्य तारीख तपासणे आवश्यक आहे. गिफ्ट बॉक्स किंवा हॅम्परमध्ये मुदत संपलेल्या वस्तू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ आकर्षक पॅकिंग पाहून खरेदी करू नये, असे आवाहन FDA ने केले आहे.
भेसळ आढळल्यास FDA कडे तक्रार करा
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवली जात आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ, संशयास्पद रंग किंवा अन्य नियमबाह्य प्रकार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी. ग्राहकांनी जागरूक राहून खाद्यपदार्थांची निवड केल्यास भेसळखोरांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button