Kohlapur News : गोकूळच्या कारभारावरून सरकार-विरोधकांमध्ये जुंपली; चार संचालकांच्या नियुक्तीचे मुश्रीफांकडून समर्थन
Kohlapur News :कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकूळ’च्या कारभारावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संघावर राज्य सरकारने चार संचालकांची नियुक्ती केल्याने काँग्रेससह विरोधकांनी सरकारवर गोकूळचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम पूर्ण होत नसल्याने निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. चार संचालकांची नियुक्ती केली नसती, तर गोकूळवर प्रशासक नेमण्याची आणि पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली असती, असा दावाही त्यांनी केला.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
गोकूळच्या निवडणुकीत काँग्रेसचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. संघाच्या उपविधीनुसार अध्यक्ष निवडीसाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक आहे. मात्र, पहिल्या बैठकीला विरोधी पक्षाचे १२ संचालक अनुपस्थित राहिल्याने कोरमअभावी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रखडली. पुढील बैठक १० तारखेला झाली असती, तरीही कोरमचा प्रश्न कायम राहिला असता, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.कोरमची अट पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्षांची निवड करता येत नाही किंवा बैठकही घेता येत नाही. बहुमताच्या जोरावर उपविधीतील ही अट डावलता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी कायदा आणि गोकूळच्या उपविधीतील तरतुदींनुसार अध्यक्ष निवडीच्या दोन ते तीन बैठका कोरमअभावी तहकूब झाल्यास प्रशासक नियुक्त करण्याची वेळ येऊ शकते. त्यानंतर संघाची पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने चार संचालकांची नियुक्ती केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले..https://maharashtramirror.com/ Kohlapur News
लोकशाही प्रक्रिया कायम ठेवण्यासाठीच निर्णय
निवडून आलेल्या २५ संचालकांच्याच हातात संघाचा कारभार राहावा आणि लोकशाही प्रक्रिया कायम राहावी, या उद्देशाने सरकारने चार संचालक नियुक्त केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. या निर्णयामुळे प्रशासक नियुक्ती आणि नव्याने निवडणूक घेण्याची शक्यता टळल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी विरोधकांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. मग त्यांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांचा अध्यक्ष निवडून आणावा, अशी अपेक्षा कशी करता येईल?” असा सवाल त्यांनी केला. निर्माण झालेला पेच सोडविण्याची जबाबदारी शासनाची असल्याचेही ते म्हणाले.
सतेज पाटील यांच्या टीकेला मुश्रीफांचे प्रत्युत्तर
गोकूळमधील घडामोडींवरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र, पुरेशी माहिती न घेता विरोधकांकडून आरोप केले जात असल्याचे मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनाही या प्रकरणाचे गांभीर्य समजले नसल्याची टीका करत, प्रत्येक विषयात मतचोरीचा आरोप करण्याची विरोधकांची भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गोकूळमधील चार संचालकांच्या नियुक्तीमुळे संघाच्या सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून, सरकारच्या या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.



