सातारापिंपरी चिंचवडपुणेसामाजिक

Satara News : ऊस उत्पादकांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; राजू शेट्टींची ४,२०० रुपयांची नवी मागणी, पुणे-बेंगळुरू महामार्ग ठप्प

Satara News : नागठाणे (जि. सातारा) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. नागठाणे परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आंदोलनातून तोडगा निघावा यासाठी राजू शेट्टी यांनी पहिल्या उचलीची मागणी ४,५०० रुपयांवरून ४,२०० रुपयांवर आणली आहे.https://maharashtramirror.com/ Satara News

सातारा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सांगलीमार्गे वळवली
नागठाणे येथे सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. साताऱ्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने सांगलीमार्गे वळवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त अंतर कापावे लागत असून प्रवासासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे.https://maharashtramirror.com/ Satara News

मागणी मान्य न झाल्यास कारखानदारांच्या दारात शिमगा आंदोलन
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत येत असल्याबद्दल राजू शेट्टी यांनी सरकार आणि साखर कारखानदारांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या उसाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“कष्टाचा ऊस दारात उभा आहे, सण तोंडावर आहे. जर सरकार आणि साखर कारखानदार यांच्या आडमुठेपणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी रस्त्यावर साजरी करावी लागत असेल, तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि शेतकरी साखर कारखान्यांचे चेअरमन आणि संचालकांच्या दारात शिमगा आंदोलन करतील,” असा इशारा शेट्टी यांनी दिला.

४,५०० रुपयांऐवजी आता ४,२०० रुपयांची मागणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवातीपासूनच ऊस उत्पादकांना पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, साखर कारखानदार ३,८०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यास तयार नसल्याने चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागावा, या भूमिकेतून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संमतीने मागणीत बदल केला आहे. आता पहिली उचल प्रतिटन ४,२०० रुपये देण्याची नवी मागणी त्यांनी जाहीर केली आहे.

“आम्ही चर्चेची दारे खुली ठेवत ४२०० रुपये पहिली उचल देण्याची नवीन मागणी जाहीर करत आहोत,” असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. या मागणीवरही सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आंदोलनस्थळी हजारो शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था
या आंदोलनात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी सहभागी शेतकऱ्यांसाठी हजारो भाकरी, भाजी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी पहिल्या उचलीची मागणी ४,२०० रुपयांवर आणल्यानंतर सरकार आणि साखर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चर्चेतून तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर महामार्गावरील वाहतूक कधी सुरळीत होणार, याचीही प्रवाशांना प्रतीक्षा आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button